पुणे जिल्हा: शिक्षकांच्या तपासणीवेळी नियमांचे उल्लंघन

भोर तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या 52 शाळा ः प्रशासनाचे दुर्लक्ष

भोर- राज्य सरकारने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाळांमधील शिक्षक व कर्मचारी यांची करोनाची तपासणी बंधनकारक केले आहे. या तपासणीसाठी भोरच्या करोना केंद्रात सरकारचे कोणतेही नियम न पाळता मोठी गर्दी होताना दिसत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 

सोमवार (दि. 23) पासून तालुक्‍यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक (नववी ते बारावी) पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. यासाठी शिक्षक आणि कर्मचारी यांची करोनाची तपासणी सुरू केली आहे. भोर येथील एका करोना केंद्रामध्ये ही तपासणी बुधवार (दि. 18) पासून सुरू केली आहे, त्यामुळे या सेंटरमध्ये तालुक्‍यातील जवळपास 52 माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.

तपासणीच्या ठिकाणी कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे या गर्दीवरून स्पष्ट होत आहे. आरोग्य विभागाने शिक्षक व कर्मचारी यांची करोना तपासणी करून घेण्यासाठी सेंटरमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग ठेवला नाही, त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना गर्दीने रांगेत उभे राहावे लागत आहे. भोर प्रशासनाचा कोणताही जबाबदार अधिकारी येथे उपस्थित नाही.

शाळांच्या स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर
सोमवार (दि. 23) पासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार हे स्पष्ट झाल्याने विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. यासाठी त्यांच्या पालकांचे संमती पत्र लिहून घेतले जाणार आहे; परंतु ज्या वर्गखोलीत विद्यार्थी बसणार आहेत त्या वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण झाले की नाही, हा खरा प्रश्‍न आहे.

प्राथमिक शाळा कधी चालू होणार, हाही प्रश्‍न पालक वर्गात चर्चेला जात आहे. गेले अनेक दिवस शाळा बंद आहेत त्यांची स्वच्छता शालेय संस्था कधी करणार, अनेक शाळांसमोर गवत वाढले आहेत. शौचालये बंद असल्याने खराब झाले आहेत. त्यामुळे शौचालयाची साफसफाईचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे.

माध्यमिक शाळा सुरू होणार असल्याने शिक्षक व कर्मचारी यांची करोना तपासणी करण्याचे आदेश असल्याने त्यांची तपासणी सुरू केली आहे. मात्र, विद्यार्थ्यांची करोना तपासणी करण्याबाबत सरकारकडून कोणतीही सूचना आलेली नाही.
– डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, वैद्यकीय अधिकारी, भोर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.