कोरेगाव भीमा (वार्ताहर) – करोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2021 रोजी पेरणे फाटा (ता. हवेली) येथे विजयरणस्तंभ मानवंदना कार्यक्रमानिमित्त विजयस्तंभास बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी नुकतीच भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रमुख विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेना प्रमुख युवराज बनसोडे, दिपंकर इंगोले, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष सुनील ढसाळ, भारतीय बौद्ध महासभा जनरल बी. एस. ढोबळे, नीलेश गायकवाड, सुनील अवचर, कमलेश चाबुकस्वार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस यंत्रणा, महसूल प्रशासन व सर्जेराव वाघमारे यांच्याशी आनंदराज आंबेडकर यांनी चर्चा केली.
यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा व प्रशासन आपल्या सोबत आहे. त्यामुळे मी 1 जानेवारीला कुटुंबीयांसोबत मान वंदनेसाठी येणार आहे. 1 जानेवारीबाबत प्रशासनाशी बोलून कळविण्यात येईल. सध्या प्रत्येकाने करोना बाबत दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक नवसरे, सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे, बाळासाहेब गाडेकर, विकास कुंभार, राजेश माने, माजी उपसरपंच रवींद्र वाळके यावेळी उपस्थित होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने विजयरणस्तंभाला मानवंदना देण्यात आली. महासंघाचे मेजर जनरल पांडुरंग ढोबळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष रघुनाथ साळवे, सचिन चव्हाण, जिल्हा सचिव संजय माने, शिवहरी गायकवाड, विजय गायकवाड आदी यामध्ये सहभागी झाले होते.