पुणे जिल्हा: वापरलेल्या सुया, इंजेक्‍शन्स पदपथावर

करोना काळात जुन्नरमध्ये नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ

Madhuvan

जुन्नर -जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर मुस्लिम दफनभूमीसमोर पदपथावर पीपीई किट सदृश वस्तू तसेच वापरलेली इंजेक्‍शन्स, स्काल्प, इंजेक्‍शन बल्ब, अम्पूल्स, नीडल सहित सिरींज इ. घातक वैद्यकीय कचरा पडलेला आढळून येत आहे. या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना देखील निष्काळजीपणे तसेच परिणामांची तमा न बाळगता रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे नागरिकांच्या तसेच त्या परिसरात चरणाऱ्या जनावरांच्या देखील जीवावर ही बाब बेतू शकते.
करोना संसर्ग काळात करोना योद्धा म्हणून सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र आरोग्य विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यापूर्वी जुन्नर शहरातीलच एका पेठेमध्ये वैद्यकीय कचरा फेकण्यात आला होता; परंतु समाजमाध्यमांमध्ये त्याची चर्चा होताच त्या कचऱ्याची परस्पर विल्हेवाट लावून गायब करण्यात आला. आता सुद्धा अशाच प्रकारे घातक वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याने या गोष्टीला जबाबदार कोण? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

घातक वैद्यकीय कचरा टाकणाऱ्या संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच याच ठिकाणी भाजीपाला कचरा सुद्धा टाकण्यात येत असल्याचे दिसत असून ओला व सुका कचरा नगरपालिकेच्या गाडीतच टाकण्यात यावा अन्यथा अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल असे आरोग्य निरीक्षक प्रशांत खत्री यांनी सांगितले.

नागरिकांच्या आरोग्याशी निगडित ही गंभीर बाब आहे. असया घातक वैद्यकीय कचरा फेकणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
-मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी जुन्नर नगरपरिषद

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.