शेतीक्षेत्राला चालना हवीच; पण नागरी सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या
लोणी काळभोर – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार अशोक पवार आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांच्यात होणारी लढत चुरशीची होणार यात शंका नाही.
शिरूर हवेली मतदारसंघात ग्रामीण व शहरी अशा दोन्ही प्रकारची लोकसंख्या आहे. ग्रामीण भागातील मतदार शेती क्षेत्रातील समस्यांना प्राधान्य देतात तर शहरी भागातील मतदार अधिक चांगल्या नागरी सुविधा देणा-या उमेदवाराच्या पारड्यात झुकते माप टाकतात. शहरी भागात प्रचंड वाढलेल्या नागरीकरणामुळे रस्ते, पिण्याचे पाणी आदी पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, कचरा विल्हेवाटीचा प्रश्न आणि पाणी टंचाई यांसारख्या समस्या कायम आहेत.
वाघोलीतील रहिवाशांना मालमत्ता कराचा बोजा वाटतो; परंतु त्यांना त्या प्रमाणात सुविधा द्यायला पुणे महानगर पालिका कमी पडते. इतर निमशहरी भागात गुंठेवारीचा प्रश्न लोंबकळत पडला आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे निधीची कमतरता असल्याने विकासकामे होत नाहीत. परिणामी शहरी व निमशहरी भागातील मतदारांच्या मनात आपल्यावर दुर्लक्ष होत आहे ही निराशेची भावना आहे.
शहरी व निमशहरी मतदारांना अपेक्षित असलेल्या रस्त्यांची गुणवत्ता, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी यांसारख्या मुद्द्यांवर कोणत्या उमेदवाराची भूमिका मतदारांना आवडेल तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. कारण 2019 सालच्या निवडणुकीत वाघोली परिसरातील मतदारांना अशोक पवार यांची वरील मुद्द्यांसंदर्भात असलेली भूमिका पटली होती. त्यामुळे या भागातील मतदारांनी अशोक पवार यांना भरघोस मतदान केले होते. परिणामी अशोक पवार शिरूर विधानसभेत आजपर्यंतच्या उच्चांकी अशा मताधिक्याने निवडून आले होते. शहरी भागात लोकसंख्या व मतदारांची घनता दाट असते. त्याचाही फायदा मोठ्या प्रमाणात उमेदवाराला होतो.
या निवडणुकीत सत्ताविरोधी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विद्यमान राज्य सरकारच्या सत्तेविरोधातील भूमिका वरचढ ठरणार का विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या सत्ते विरोधातील भूमिका वरचढ ठरणार या निकषावर विजयश्री उमेदवाराच्या गळ्यात माळ घालणार आहे. दोन्ही भूमिकांचे फायदे उठवून तोटे कमी करण्यात जो यशस्वी होईल त्याला शिरूर-हवेली मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही उमेदवारांसमोर केवळ मते मिळवण्याचेच नव्हे; तर शिरूरच्या खोलवर रुजलेल्या प्रश्नांना अर्थपूर्ण मार्गाने सोडवण्याची क्षमता सिद्ध करुन ते मतदारांसमोर मांडण्याचे आव्हान आहे.