पुणे -दूध खरेदी व विक्री दरात सर्वत्र एकवाक्यता असावी याबाबत चर्चा होऊन दूध उत्पादकांना प्रति लिटर रुपये 29 रुपयांपेक्षा कमी दर कोणीही देउ नये, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसेच, ग्राहकांवर कसलाही बोजा पडू नये, याची खबरदारी घेऊन पाऊच पॅकिंगच्या एमआरपीमध्ये कसलीही वाढ न करता वितरण कमिशन खर्चात कपात करावी. डिलर रेट प्रति लिटर रुपये 40 रुपयांपेक्षा कमी नसावा, असा निर्णय एकमताने राज्यातील सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला.
दूध खरेदी विक्रीच्या दराचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा कात्रज डेअरी पुणे येथे पार पडली. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यामध्ये सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांचे सुमारे 40 प्रतिनिधी उपस्थित होते.
करोना व्हायरस संसर्गामुळे जवळपास वर्षभर संघटनेची सभा घेता आली नाही. करोना व्हायरस संसर्गामुळे दूध व्यवसाय अडचणीत आलेला असून पाऊच पॅकिंगमधील दूध विक्री मागील वर्षाचा विचार करता सुमारे 35 टक्के कमी झाली आहे. मात्र, सध्या बाजारपेठेत दूध पावडर व बटरच्या दरात वाढ झाली असून यामुळे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे. दूध उत्पादकांना चांगला दर मिळतो ही चांगली बाब आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे चेअरमन रणजित देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदार यांच्यामध्ये सामंजस्य राखण्यासाठी ज्याप्रमाणे एफआरपी व एमएसपी, अशा गोष्टी सरकारने सहभाग घेऊन केलेल्या आहेत. दूध व्यवसायातही शेतकऱ्याला कमीत कमी परवडणारा दर कायमस्वरुपी देण्यासाठी पुढील आठवड्यात होणाऱ्या सल्लागार समितीच्या बैठकीत मांडला जाईल, असे सांगितले. सरकारच्या पातळीवर शेतकऱ्यांसाठी दूध व्यवसाय कायम स्वरुपी परवडणारा राहील, असे धोरण घेण्याचे सर्वानुमते ठरले. संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी आभार मानले.