रेडा – बेरोजगार युवकांना नोकरीचे अमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालण्याचे प्रकार इंदापूर तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. करोनाच्या खाईत सापडलेले बेरोजगार नागरिक नोकरीच्या शोधात फसवणूकीत भरडला जाऊ लागला आहे. तुम्हाला रेल्वेमध्ये चांगल्या पदावर नोकरी लावतो म्हणून अनेक युवकांकडून पैसे उकळले जात आहेत. असाच प्रकार इंदापूर तालुक्यात घडला आहे. नोकरीच्या अमिषाने साडेबारा लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या सहाजणांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
याबाबत श्रीकांत पांडूरंग राऊत (रा. इंदापूर ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात गणेश राधाकिसन वर्पे (रा. वरवंडी ता. संगमनेर जि.अहमदनगर) अंकुश विजयराव धाकडे, संगेश आर. धाकडे (दोघे रा. सावळी बुद्रूक ता. अचलपूर जि. अमरावती), मनोज रावसाहेब गायकवाड, मनिष वानखेडे (दोघेही रा. ता. मोशी जि. अमरावती) महेंद्र उर्फ चिंटू शिवाजी काटकर (रा. वडापूरी ता. इंदापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत राऊत हे खासगी शाळेत शिक्षक असून त्यांच्या पत्नी शासकीय नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या विभागात अर्ज भरून परिक्षा देत होती. दरम्यान मार्च 2018 मध्ये महेंद्र शिवाजी काटकर (रा. वडापूरी ता. इंदापूर) याने राऊत यांच्या घरी येवून तुम्ही एका खासगी शाळेत शिक्षक आहात. तुम्हाला पुरेसा पगार नाही. तुमच्या पत्नीला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावतो, त्यासाठी पैसे द्यावे लागतील असेही त्याने सांगितले. त्यामुळे दोन तीन दिवसांत महेंद्र काटकर यांच्यासोबत अंकुश धाकडे, मनोज गायकवाड, मनिष वानखेडे राऊत यांच्या घरी आले. रेल्वेमध्ये या सर्वांचे ओळखीचे अधिकारी आहेत.
त्यांच्यासोबत आमचे जवळचे सबंध आहेत. गावातल्या अनेक लोकांनी पैसे भरून यांच्याकडे नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे काटकर याने सांगितले. यावर राऊत यांनी वानखेडे यांना यापूर्वी कोणाचे काम केले आहे, अशी विचारणा केली. त्यावेळेस धाकडे यांनी फाईलमधील अनेकांना नोकरी लावल्याची ऑर्डर दाखविली. एक महिन्यानंतर त्यांच्या पत्नीची कागदपत्रे घेवून येण्यास सांगितले. तुमच्या कामासाठी दहा लाख रुपये लागतील. सध्या तीन लाख रुपये द्या, अशी मागणी केली. त्यामुळे राऊत यांनी जुलै 2018 ला 1 लाख 60 हजार पंधरा रुपये धाकडे यांचे भाऊ संकेश धाकडे यांच्या अचलपूर बॅंकेच्या खात्यात जमा केले.
त्यानंतर 25 हजार, व पुन्हा काटकर यांच्याकडे दहा हजार रुपये असे एकूण 1 लाख 95 हजार 15 रुपये दिले. राऊत यांनी नोकरीबाबत विचारणा केली असता मनिष वानखेडेला विचारा असे सांगितले. मात्र त्याने प्रतिसाद न दिल्याने राऊत यांनी काटकर यांना माझे पैशे द्या, अशी मागणी केली. मात्र तुम्ही मला पैसे दिले नाहीत, मला पैसे मागितले तर पोलिसांत तक्रार करीन असे काटकर याने सांगितले. त्यामुळे नोकरीचे अमिष दाखवून आपली फसवणूक झाल्याचे राऊत यांच्या लक्षात आले.त्यामुळे सर्वांनी इंदापूर पोलिसांत धाव घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दाजी देठे करीत आहेत.
यांची झाली फसवणूक
श्रीकांत राऊत 1 लाख 95 हजार 15 रुपये, आसामा अब्दुलगणी मुलाणी 2 लाख 21 हजार 25 रुपये, संजय अंकुश ठवरे यांची 2 लाख 21 हजार 625 रुपये, अनिल चतुर्भूज पवार यांचे 2लाख 92 हजार 15 रुपये, देवांगना राम जाधव पुणे यांची 2 लाख पाच हजार, तर सत्यवान कांतीलाल पासगे यांची 1 लाख 18 हजार 515 रुपयांची फसवणूक झाली आहे. या सर्वांची 12 लाख 52 हजार 595 रुपयांची नोकरीच्या अमिषाने फसवणूक झाली आहे.