मंचर : मंचर (ता. आंबेगाव) येथे पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे दोघेजण जखमी झाल्याची घटना मंगळवार, दि. १४ रोजी घडली आहे. मांजा वापरावर बंदी असतानाही मंचर शहरात नायलॉग मांजा आला कुठून ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांची मांजा कारवाईबाबत उदासीनता दिसून आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की मंचर (ता. आंबेगाव) येथील एसटी बस स्थानक परिसरात दुपारी दुचाकीवर चाललेल्या तरुणाच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याने गळ्याला जखम होऊन तरुण जखमी झाला आहे.
तरुणाने तत्काळ दुचाकी थांबवल्याने मोठा अनर्थ टळला असून तो थोडक्यात बचावला आहे. तर दुसऱ्या एका पायी चालणाऱ्या तरुणाच्या हाताच्या बोटांना मांजामुळे जखम झाली आहे. जखमी झालेल्या दोन्ही तरुणांची नावे समजली नाही. मंचर बस स्थानकाच्या जवळपासच्या उंच असलेल्या इमारतींवर पतंग उडवले जात होते. या पतंगापैकी काही पतंग मांजासह तुटून मंचर बस स्थानकाजवळ आल्याने पतंगाच्या मांजाने दोन तरुण जखमी झाले आहे, असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडवण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून आहे. मात्र, पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा धागा हा साधा असावा असा नियम असून मांजा वापरावर राज्यात बंदी आहे. तरीही मंचर परिसरात पतंग उडवण्यासाठी मांजाचा वापर दिसून आल्याने लहान मुले, महिला नागरिक, पक्षी, प्राणी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मांजा विक्रीवर बंदी असतानाही मंचर शहरात मांजा कसा आला ? पोलीस प्रशासन यांनी पतंगासाठी मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली नाही का ? केली तर त्यांना मांजा सापडला नाही का ? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. तर बंदी असतानाही मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याचे आदेश असतानाही मंचर पोलीस व नगरपंचायत प्रशासन विभाग फक्त डोळे झाकून पाहत राहिला का? असा प्रश्न देखील अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मंचर शहरात सोमवार, दि.१३ रोजी पोलिसांनी पेट्रोलिंग करून मांजा विकणाऱ्या दुकानदारांबाबत तपासणी केली होती. परंतु मिळाले नाही, मांजा विक्री कोणी करत असेल तर याबाबत कोणाला काय माहिती असल्यास त्यांनी मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
– श्रीकांत कंकाळ, पोलीस निरीक्षक, मंचर पोलीस ठाणे.
मंचर शहरात मांजा विक्री कोणी विकत असेल तर त्यांनी तात्काळ मंचर नगरपंचायत किंवा मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. मांजा विक्रीला बंदी आहे ,हे दुकानदारांना आम्ही आवाहन करून सांगूनही कोणी जर विकत असेल तर त्याच्याविरोधात मंचर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणार आहे.
-गोविंद जाधव, मुख्याधिकारी, मंचर नगरपंचायत.