कान्हूर मेसाईत मित्राच्या कुटुंबाला आधार : गावकरी एकवटले
शिक्रापूर : कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील ज्ञानेश्वर पुंडे यांचे दुर्धर आजाराने निधन झाल्यानंतर त्यांचे कुटुंब निराधार झाल्याने ग्रामस्थांनी एकवटून कुटुंबीयांसह त्यांच्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी दोन लाख रुपयांच्या मदतीचा आधार दिला आहे.
कान्हूर मेसाई येथील ज्ञानेश्वर पुंडे यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. ज्ञानेश्वर यांच्या निधनाने त्यांचे वृद्ध वडील, पत्नी व दोन मुले निराधार झाल्याने संकट मोचक म्हणून ओळख निर्माण केलेले समाजसेवक शहाजी दळवी यांनी पुढाकार घेत सदर कुटुंबीयांना मदतीचे आवाहन केले. विशाल पुंडे व नाथा पुंडे या दोघांनी विशेष परिश्रम घेत सोशल मीडियावर देखील आवाहन केले.
ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांची मदत संकलित करुन नुकतीच ज्ञानेश्वर यांच्या दशक्रिया दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांना मदतीची रक्कम सुपूर्त करण्यात आली. मात्र, यावेळी ग्रामस्थांनी दिलेल्या आधारामुळे पुंडे कुटुंबीय देखील भारावून गेले. याबाबत बोलताना निराधार नागरिकांना तसेच गरजू रुग्णांना मदतीसाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत समाजसेवक शहाजी दळवी यांनी व्यक्त केले.