ओतूर : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सोहळ्यासाठी ओतूर (ता. जुन्नर) येथे शनिवारी (दि. 17 मे) भव्य दिव्य मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पादुका श्रीक्षेत्र देहू येथून हेलिकॉप्टरने आणण्यात येणार आहेत. संपूर्ण ओतूर गावावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
संत तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी ओतूर येथे आहे. वारकरी संप्रदायाचा जगप्रसिद्ध राम कृष्ण हरि हा महामंत्र याच ठिकाणी संत तुकाराम महाराज यांना बाबाजी चैतन्य महाराज यांनी दिला आहे. भव्य दिव्य वैकुंठगमन सोहळ्यासाठी विशेष मिरवणूकीचे नियोजन ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) व तुळशीराम महाराज सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्या निमित्त रविवारी (दि. 18 मे) ते 25 मे 2025 पर्यंत आगळ्या वेगळ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच समाजोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सोहळ्याची ओतूर सह संपूर्ण जुन्नर तालुक्यातून जोरदार तयारी सुरू आहे. सदर सोहळ्यास खेड, आंबेगाव, शिरूर, पारनेर, संगमनेर, अकोले व मुरबाड तालुके सुध्दा आपले योगदान आणि सहकार्य करणार आहेत, अशी माहिती जुन्नर तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम डुंबरे यांनी दिली आहे.
मिरवणुकीचे वैशिष्ट्य
मिरवणुकीत 375, धर्म ध्वज, 375 टाळकरी, 375 विणेकरी, 375 तुलसी वृंदावन धारक महिला, 375 कलशधारक महिला, 375 तुकाराम नावाच्या व्यक्तींचा समावेश आदींचे नियोजन करण्यात येणार आहे.