परिसरात सोयीसुविधांचा अभाव ः प्रशासनाचे दुर्लक्ष
तळेगाव ढमढेरे – येथे दर सोमवारी आठवडे बाजार भरविण्यात येतो. तळेगाव ढमढेरे परिसरातील सोळा गावाचे मुख्य ठिकाण असल्याने इतर गावातील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी सोमवारी मोठ्या संख्येने येतात. परंतु काही महिन्यांपासून पर्यायी मार्गावर गटारलाइनचे पाणी येते. तसेच कचरा व घाणीचे साम्राज्य असल्याने हा पर्यायी मार्ग वापरला जात नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी मार्गाची साफसफाई, गटारलाइनचे काम करून बाजार दिवशी फलक लावून एका दिवसासाठी त्यामार्गाने वाहतूक सुरू करणे आवश्यक आहे.
शिक्रापूर, न्हावरे हा रस्ता येथील बाजारातून जात असल्याने रस्त्यावर वाहनाची गर्दी असते. सोमवारी हा रस्ता बाजार असल्याने ग्राहकांच्या गर्दीने बंद होतो. त्यात वाहने येत असल्याने सोमवारी तासन् तास वाहतूक कोंडी होते. पर्यायी रस्ता नदीच्या बाजूने आहे परंतु त्याचा वापर केला जात नाही. यासाठी उपाययोजना करून सोमवारी त्याठिकाणी पर्यायी मार्गाचे फलक लाऊन.त्यामार्गे वाहतूक करणे आवश्यक आहे.
सध्या ऊस कारखाने सुरु झाल्याने उसाचे भरलेले ट्रॅक्टर, ट्रक जातात. भर बाजारातून भरलेले ट्रॅक्टर, ट्रक जात असल्याने टायर फुटला किंवा ट्रेलर पलटी तर झाला तर मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होऊ शकते. तसेच बाजार मैदान दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन व कंपनी याच्या मार्फत बाजारात बसथांबा असल्याने प्रवासी, ग्राहक व नागरिकांच्या सोयीसाठी शौचालय बांधले आहे. परंतु हे शौचालय लोकार्पणाच्या अगोदरच खचले गेले. याबाबत संबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बाजारात सोयी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांनी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पुढील दोन, तीन दिवसांत बाजार मैदान येथील गटार लाइनचे काम करण्यात येणार आहे. पुढील सोमवारी आठवडे बाजारला पर्यायी रस्ता वापरात आणला जाईल. तसेच रस्त्यावरील गतिरोधकासाठी सदर विभागाशी पत्रव्यवहार करणार आहे. खचलेल्या शौचालयाच्या कामाचा दर्जा पाहून ते दुरुस्त किंवा नवीन उभे करून नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातील.
– अंकिता भुजबळ, सरपंच तळेगाव ढमढेरे
तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्याचे नवीन काम झाले आहे. या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने वेगाने येतात. आठवड्यातून एक, दोन तरी छोटे मोठे अपघात या भागात होतात. गावाच्या ठिकाणी व मुख्य चौकात गतिरोधक असणे आवश्यक आहे. तसेच प्रवासी, नागरिक, ग्राहकांच्या सोयीसाठी शौचालयाची सोय करण्यात यावी.
– स्वप्नील खेडे, व्यावसायिक