पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर घाटापासून मंचर बाह्यवळणापर्यंत वाहनांच्या रांगा
सिमेंट रस्त्याच्या कामामुळे नाराजी
मंचर – पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर घाट, मंचर, तांबडेमळा बायपास या 7 किलोमीटर अंतरावर हजारो वाहने सिमेंट रस्त्याच्या कामामुळे सुमारे 11 तास वाहतूक कोंडीत सापडली. त्यामुळे अक्षरशः वाहन चालकांनी संताप व्यक्त करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
सिमेंट रस्त्याचे काम चालू असल्याने वाहतूक कोंडीचा सामना अनेक प्रवाशांना आणि वाहन चालकांना करावा लागला. सद्यस्थितीत दिवाळी सण संपवून परत माघारी पुणे-मुंबईकडे जाणारे प्रवासी आणि चाकरमाने मोठ्या प्रमाणात आहे. पेठ गावाच्या म्हणजे मंचरच्या बाजूने तर राजगुरुनगर घाट किंवा पानमाळ्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम चालू आहे. तेथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. सद्यस्थितीत एकच लेन जाण्यासाठी आणि येण्यासाठी असल्याने हजारो वाहने अडकून पडली होती. पोलीस आणि त्याचे कर्मचारी यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला; परंतु वाहने जास्त असल्याने वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी सुमारे 11 तास वेळ लागला.
अवसरी, पेठ ते अवसरी घाट या दरम्यानही वाहतूक कोंडी झाली होती. अक्षरशः पेठ गावाच्या जुन्या रस्त्यावरून अनेक वाहने मंचरच्या दिशेने येत असताना वाहतूक कोंडीत अडकून बसली. त्यामुळे दिवाळी आणि त्यानंतर मतदान होईपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम थांबवावे, अशी मागणी वारंवार करूनही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे-वारजे येथील हमरस्त्याचे अधिकारी मात्र वाहन चालक आणि प्रवाशांच्या मागणीला जुमानत नसल्याने प्रवाशांनी आणि वाहन चालकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
पुणे-नाशिक हमरस्त्याचे समन्वयक दिलीपराव मेदगे यांच्याकडे नागरिकांनी वाहतूक कोंडी संदर्भात तक्रारी केल्या असून त्यांनी या संदर्भात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे-वारजे वरिष्ठ अधिकार्यांची झाडाझडती घेऊन वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी सूचना केल्याचे सांगण्यात आले.
अधिकारी ऐकेनात
शनिवारी (दि. 9) सायंकाळी चार वाजता वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. रविवार (दि. 10) पहाटे तीन वाजेपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे मंचर पोलिसांनी सांगितले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. याबाबत अनेकदा मंचर पोलिसांनी वारजे पुणे येथील हमरस्ता अधिकार्यांना लेखी निवेदन देऊनही दिवाळीपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवावे. अशी मागणी करूनही अधिकारी मात्र रस्त्याचे काम थांबवायला तयार नसल्याचे सांगण्यात आले.