उरुळी कांचन : उरुळी कांचन व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी व वेगाने होणाऱ्या विकासाला चालना देण्यासाठी उरुळी कांचन पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रस्तावित वाहतूक व्यवस्थेनुसार गावाच्या पूर्व-पश्चिम बाजूस तसेच मध्यवर्ती ठिकाणी क्रॉसिंग व्यवस्था निर्माण होणार असल्याने नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षितपणे इच्छितस्थळी पोहोचण्यास मदत होईल. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.
वाढत्या रहदारीमुळे उरुळी कांचन परिसरात, वाहनचालकांना, नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन पोलीस वाहतूक विभाग, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, ग्रामपंचायत प्रशासन, व्यापार आघाडी, स्थानिक प्रशासन, व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याशी चर्चा करून संयुक्तरित्या 15 दिवसांच्या ट्रायल बेसिसवर या उपाययोजना आखल्या आहेत.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील दोन्ही चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. मागील एक ते दीड महिन्यांपूर्वी योग्य वाहतूक नियोजनामुळे तळवडी चौकात होणारी वाहतूक कोंडी दूर झाली होती. मात्र, उरुळी कांचन येथील व्यापारी असोशियनच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पाटील यांनी राबविलेला बॅरिकेट्स पॅटर्न थांबवला गेला. पाटील यांनी केलेल्या नियोजनाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले होते.
उरुळी कांचन येथील तळवडी चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. आठवड्याच्या शनिवारी व दर रविवारी असलेला आठवडे बाजार यामुळे एलाईट चौक व तळवडी चौकात दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. लग्नसमारंभ आणि सुट्ट्या यामुळे पुणे- सोलापूर महामार्गावर रविवारी दिवसभर वाहनांची गर्दी असते. शनिवारी दुपारनंतर पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढते. तसेच रविवारी सायंकाळी पाचनंतर सोलापूरवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढते.
“उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांच्या सोयीकरिता हे पंधरा दिवसांच्या ट्रायल बेसवर हे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील वाहतूककोंडीतून उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांची सुटका करण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे.”
– शंकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस ठाणे
“उरुळी कांचन सारख्या झपाट्याच्या वेगाने वाढणाऱ्या गावांमध्ये वाहतुकीसाठी क्रॉसिंग, एंट्रन्स किंवा एक्झिट साठी किमान दोन-तीन पर्याय व्यवस्था असणे आवश्यकच होते. प्रस्तावित वाहतूक नकाशा प्रमाणे गावाच्या पूर्व पश्चिम बाजूस आणि मध्यवर्ती ठिकाणी क्रॉसिंग व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्यामुळे गावकऱ्यांना तात्पुरती (उड्डाणपूलच होणे गरजेचे आहे) परंतु एक संतुलित पर्यायी व्यवस्था मिळू शकेल असे वाटते.”
– विकास जगताप, उपाध्यक्ष, भाजपा व्यापार आघाडी महाराष्ट्र राज्य
“उरुळी कांचन पोलिसांनी बॅरिकेट्स पॅटर्न राबवल्याने व्यापाऱ्यावर आभाव झाला असे व्यापाऱ्यांचे मत बाहेर आले. पोलिसांनी नवीन मॅप आणला आहे. त्यानुसार वाहतूक सुरुळीत करताना प्रत्यक्ष अंमलबजावनी झाल्यावर समजणार आहे. पोलिसांनी केलेल्या या नवीन मॅपला चालना देण्यासाठी अंमलबजावणी करून सहकार्य करू”
– संतोष कांचन, माजी सरपंच, उरुळी कांचन.