पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात पुणे विभागात पुणे जिल्ह्याने बाजी मारली आहे. पुणे जिल्ह्याचा सर्वाधिक 97.93 टक्के निकाल लागला आहे. पुणे जिल्ह्यातील 1 लाख 2 हजार 282 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे.
बुधवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनीच मोबाइल, संगणक, लॅपटॉप यांचा निकाल पाहण्यासाठी वापर केला. निकाल जाहीर होताच आपापल्या घरांमध्ये, सोसायटीत पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
पुणे विभागाच्या निकालासाठी विभागीय मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे, सचिव प्रिया शिंदे यांनी विशेष भूमिका बजावली आहे. पुणे विभागात परीक्षेसाठी नोंदणी झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 58 हजार 204 असून त्यापैकी 2 लाख 57 हजार 8 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. यातील 2 लाख 50 हजार 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यानुसार विभागाचा एकूण निकाल 97.34 टक्के एवढा लागला आहे.
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या 26 हजार 688 होती. त्यातील 26 हजार 279 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 20 हजार 4 असून त्याची टक्केवारी 76.14 आहे. पुणे विभागातील 1 लाख 2 हजार 282 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. यात पुणे जिल्ह्यातील 50 हजार 688, अहमदनगर जिल्ह्यातील 25 हजार 847, सोलापूरमधील 25 हजार 747 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय निकाल (टक्केवारी) आंबेगाव (98.54), बारामती (98.39), भोर (97.79), दौंड (96.95), हवेली (98.06), इंदापूर (96.74), जून्नर (97.78), खेड (96.83), मावळ (98.17), मुळशी (97.31), पुणे शहर पश्चिम (98.16), पुरंदर (98.47), शिरुर (97.81), वेल्हा (98.04), पुणे शहर पूर्व (97.91), पिंपरी-चिंचवड (98.46).