प्रचाराला वेग ; गावागावांत मतदारांशी संवाद
इंदापूर – येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत, इंदापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचे चित्र दिसून येत आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह, अपक्ष उमेदवार संपूर्ण मतदार संघ प्रचारादरम्यान पिंजून काढत असून, गावागावांत मतदारांशी संवाद साधत आहेत. मतदानाला दहा दिवसापेक्षा कमी दिवस शिल्लक असतांना, प्रचाराला वेग आला आहे. यावेळी इंदापूर मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार असून तिरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे.
इंदापूर विधानसभा मतदार संघात यावेळी अनेक वर्षानंतर तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष म्हणून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण माने यांसह अन्य अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्यांदाच इंदापूरची विधानसभा अत्यंत चुरशीची होणार आहे.
या मतदारसंघात आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने या तिघांनीही प्रचारात वेग घेतला असून, केलेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांचेशी संवाद साधत आहेत. विकासकामे, विविध उपक्रम व योजनांच्या माध्यमातून मतदारांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत. त्यातच आमदार दत्तात्रय भरणे यांना साथ देण्यासाठी, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत प्रचाराला रंगत आणलेली आहे.
सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ दादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन विकास आघाडीचे प्रवीण माने यांच्याकडे देखील एक दोन मोठ्या नेत्यांनी प्रवेश करत, प्रचारात टीकेची राळ उडवलेली आहे. युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद माने यांच्या पाठीशी दिसून येत आहे. असे असले तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. पवार साहेबांना अडचणीच्या काळात, साथ देण्यासाठी जनतेला मतदारांना, हर्षवर्धन पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद गावागावातून मिळताना दिसत आहे.
मोठ्या नेत्यांच्या सभा
येणार्या दोन दिवसांपासून, महाविकास आघाडी, महायुती या वरिष्ठ राजकीय पक्षांचे नेते इंदापूर तालुक्यात सभा घेणार आहेत. त्यावेळी यापेक्षा वेगळे वातावरण पाहण्यास मिळणार आहे. खुद्द शरद पवार यांनी या विधानसभा मतदारसंघात जास्तीचे लक्ष घातल्यामुळे हर्षवर्धन पाटलांसाठी लाभदायक मानले जाते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व राजकीय आयुधे वापरत, इंदापूर मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवले आहे.