* पालखी मार्गाच्या कामामुळे शिंदे वस्तीतीचा रस्ता बंद
* 30 फूट कडा चढावी-उतरावी लागतेय
नीरा – पुरंदर तालुक्यातून सध्या पुणे-पंढरपूर महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र याच मार्गाचे काम होत असताना काही लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिसुर्टी ते लोणंद या दरम्यान बाह्यवळण रस्त्याचे काम करत असताना शिंदेवस्तीला जाणारा रस्ता हा आता बंद झाला आहे. सुरुवातीच्या काळात केंद्रीय बांधकाम विभागाने हा रस्ता करून देतो असे म्हटले होते, मात्र जवळपास 12 महिने झाले तरी देखील या लोकांना रस्ता करून देण्यात आला नाही.
शिंदेवस्ती ही पिंपरे खुर्द या गावाचा एक भाग आहे. गावाच्या पश्चिमेला अगदी जेऊर गावच्या सीमेवर ही वस्ती अनेक वर्षांपासून वसलेली आहे. या वस्तीवर यायला जायला पूर्वी कच्चा रस्ता होता. मात्र पुणे पंढरपूर बाह्यवळण मार्गाचे काम करत असताना याच रस्त्यावर राष्ट्रीय रस्ते विभागाने रस्ता मोठा करण्यासाठी आणि त्याची लेव्हल करण्यासाठी जवळपास 30 फुटापर्यंत खोल खोदकाम केले आहे.
त्यामुळे हा 30 फूट कडा चढून आपल्या गावाकडे या लोकांना जावे लागते आहे. त्यामुळे या भागात जाणारी वाहने बंद झाली आहेत. त्यामुळे या लोकांचा रस्ता अडला आहे. शेतात मदतीसाठी वाहन आणि अवजारे नेणे सुद्धा अवघड झाले आहे. मागील चार दिवसांपूर्वी याच वस्तीवरील एका वृद्धाला शारीरिक त्रास होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचे होते. मात्र रस्ता नसल्याने या ठिकाणी कोणतेही वाहन येऊ शकत नव्हते. जवळपास एक किलोमीटर या वृद्धाला झोळीत घालून न्यावे लागले. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
गेली दीड वर्षे या रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे आम्हाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे; मात्र मागील काही काळापासून रस्ता खोदला गेला आणि आमचा रस्ता बंद झाला. काम करायला आमचे हरकत नाही मात्र आमचा सेवा रस्त्यावर शासनाने आम्हाला करून द्यावा अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन करू आणि रस्त्याचे काम आम्ही बंद पाडू
– गोपी शिंदे, ग्रामस्थ
एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता होतोय तर दुसर्या बाजूला त्याच रस्त्याच्या बाजूला असणार्या लोकांना वहिवाटीसाठी रस्ताच दिला जात नाही. त्यामुळे या लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अन्यथा सुरू असलेल्या रस्त्याचे काम बंद पाडण्याशिवाय आमच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही.
– दिलीप थोपटे, माजी संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना