शिवव्याख्याते संपत गारगोटे : शिरोलीत संयुक्त जयंती
राजगुरूनगर – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षपणा, मानवता ही तत्व आपल्याला पदोपदी दिसतात आणि हीच तत्व भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अंतर्भूत केली आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्यख्याते संपत गारगोटे यांनी व्यक्त केले.
शिरोली (ता. खेड) येथे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने शिवराय जय भीमराय हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळेस या परिसंवादात गारगोटे बोलत होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगदीश ओव्हाळ, अॅड. साधना बाजारे, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरीश देखणे, मोहिनी राक्षे, प्रा. अशोक वंजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपत गारगोटे म्हणाले की, भारत म्हणून आपण स्वतंत्र लोकशाही राष्ट्र आहोत. 75 वर्षांच्या कठीण कालखंडातून जातानाही आम्ही लोकशाहीची मुल्यं जपली. भारताच्या मागे पुढे स्वतंत्र झालेल्या अनेक देशांतली लोकशाही व्यवस्था मोडकळीस आली. पण आपण मात्र सर्वात मोठी लोकशाही म्हणून नावारूपास आलो. हे का शक्य झाले असेल, कारण आपल्या गतकाळातील पिढ्यांनी धर्मनिरपेक्षफ चारित्र्य निर्माण करून ठेवलंय, असे त्यांनी नमूद केले
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक, आदर्श पत्रकार, युवा उद्योजक, समाजभूषण, उद्योजक, युवा भूषण, युवती भूषण आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक स्वाभिमानी रिपब्लिकन महासभे हरीश देखणे यांनी, सूत्रसंचालन आकाश बोबंले यांनी केले.