रांजणगाव गणपती – शिरूर तालुक्यामध्ये सध्या काही ठिकाणी कांद्याची काढणी सुरू आहे. त्यातच कांद्याला व नगदी पिकांना वाढलेल्या बाजारभावामुळे सध्या शेतकऱ्यांसमोर शेतीमालांच्या चोरीचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता रात्रभर डोळ्यात तेल घालून शेतमालाची राखण करण्याची वेळ आली आहे. रात्र वैऱ्याची, अशी म्हण असताना ही रात्र चोरांची, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सध्या शेतमालांचे भाव मागणी व पुरवठ्यानुसार कमी जास्त प्रमाणात वाढत व कमी होत आहेत. काही शेतीमालांना सध्या प्रतवारीनुसार चांगलाच बाजारभाव मिळत आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा, काकडी, मेथी कोथिंबीर, शेवगा या पिकांना बाजारात मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून पुरवठा होत आहे. मात्र, वातावरणातील बदलांमुळे, व कमी जास्त प्रमाणात होत असलेल्या थंडीमुळे पिकांच्या वाढीला पोषक असे वातावरण नसल्याने, व सकाळी पिकावर पडत असलेल्या धुक्यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आपला शेतमाल आहे, त्या परिस्थितीत बाजारात नेत आहेत. मात्र, कांद्याची काढणी चालू होताच कांद्याच्या व इतर पिकांच्या चोरीला शेतकऱ्यांना सध्या सामोरे जावे लागत आहे. मात्र, ऐन थंडीतही शेतकरी शेकोटी पेटवून रात्रीचा दिवस करून आपल्या शेतमालाची राखण करीत आहेत. कारण जर शेतीमाल चोरीला गेला तर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. पुढील एक वर्षातील आर्थिक गणितंही बिघडते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून जागरण करून शेतमालाची राखण करावी लागत आहे.
दिवसभर कामात, रात्रभर जागरणात
सध्या सोनेसांगवी, वाघाळे शिवारामध्ये कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र, चोरटे कांदा, टोमॅटो यासारखी नगदी पिके चोरत असल्याने सोनेसांगवी येथील युवा शेतकरी सुनील कांतीलाल डांगे, सुरेश दत्तू डांगे हे शेतकरी आपली दिवसभरात ही दिनचर्या उरकून रात्री रानात कांद्याची राखण करीत आहेत.