नगरपरिषदेचे दुर्लक्ष : सुविधांच्या नावाने बोंब
आळंदी – चाकण चौक येथे (इंद्रायणी काठी) आळंदी नगर परिषदेने माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था व्हावी यासाठी नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिली असून ती कार्यवाहीसाठी ठेकेदाराकडे वर्ग केली आहे; मात्र या ठिकाणी सध्या तरी या पार्किंग व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.
येथे आपली वाहने पार्क करण्यासाठी आलेल्या भाविकांना अनंत समस्यांना सामोरे जावे लागते. पार्किंगच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अत्यंत खड्डेयुक्त रस्ता झाला आहे. वाहनांना या ठिकाणाहून ये-जा करताना कमालीची कसरत करावी लागते. तसेच प्रमुख रस्ता देखील अत्यंत खराब झाला आहे, याकडे आळंदी नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने भाविकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
या ठिकाणी पार्किंग हद्दीच्या चारही बाजूने हॉटेल, भाजीविक्रेते व इतर छोटी मोठी दुकाने असल्याने वाहने पार्क करण्यासाठी जागा अपुरी पडते. या व्यवसायिकांनी नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेतच बसावे असे ठेकेदाराकडून सांगितले जाते.
पालिकेने पार्किंग व्यवस्थेसाठी एका साइडला पत्र्याचे शेड मारून द्यावे, इंनडोर/ आऊटडोर वाहन प्रवेश या ठिकाणी लोखंडी गेट बसवण्यात यावेत. या व इतर सुविधा देण्यासाठी वेळोवेळी पालिकेकडे संबंधितांनी निवेदने दिली आहेत, तरी देखील पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशा असणाऱ्या गैरसोयीच्या पार्किंगची फी का भरावी , असा सवाल देखील केला जात आहे.
“येत्या आठ दिवसांत पार्किंगमधील ज्या-ज्या गैरसोयी असतील त्या प्राधान्य क्रमाने सोडवल्या जातील.”
– अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी