पुणे जिल्हा: विजयी उमेदवार जोमात पॅनल प्रमुख कोमात

राहुल गणगे 

पुणे – राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहे. त्यामुळे गावागावांतील पॅनलप्रमुख निवडून आलेल्या उमेदवारांवर करडी नजर ठेऊन आहेत. सरंपचपदाचे आरक्षण जाहीर होईपर्यंत आपल्या गटातील उमेदवार विरोधकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेते वॉच ठेऊन आहेत. बहूतांश ग्रामपंचायतींवर निसटती सत्ता काबिज करणाऱ्या गटांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य सध्या आऊट ऑफ कव्हरेज आहेत. अशी चर्चा गावागावांत व कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

निवडून आलेला एक जरी सदस्य विरोधकांच्या गळाला लागला तर आपली सत्ता जाऊ शकते या चिंतेत पॅनल प्रमुख पडले आहेत. यासाठी नवनिर्वाचित सदस्य सध्या पर्यटन दौऱ्यावर गेल्याचे दिसून येत आहे. पॅनलप्रमुख या सदस्यांना फिरायला घेऊन जाणे, गावगाड्यात घडामोडी याबाबत सतर्क झाले आहेत. तर काहीजण गोव्यासह अन्य ठिकाणी फिरायला गेल्याचेही चित्र आहे. आमचेच सर्वाधिक उमेदवार विजयी ठरले, असा दावा करणाऱ्यांना आता सरपंच आरक्षणाची चिंता लागली आहे.

सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही सरपंच आरक्षण कोणत्या प्रवर्गातील पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, एखाद्या गटाचे सर्वाधिक उमेदवार विजयी ठरल्यानंतरही त्यांच्याकडे सरपंच आरक्षणानुसार संबंधित उमेदवार नसल्यास विरोधकांकडील त्या प्रवर्गातील उमेदवाराला सरपंचपदाची लॉटरी लागणार आहे. यासाठी प्रत्येकाची उमेदवार मिळविण्यासाठी धडपड सुरू झालेली दिसून येत आहे. परंतु कोणताही उमेदवार गावात नसल्यामुळे तसेच मोबाइल संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचा आवाज कानी पडताच पॅनलप्रमुखांचा हिरमोड होत आहे.

तर बिनविरोध झालेल्या उमेदवारांना वेगवेगळी अमिषे दाखवून आपल्याकडे कसे येतील यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. तर गावागावा कोणता उमेदवार कुठं आहे, याची चाचपणी सुरू झाली आहे. तर पळवा पळवी तसेच फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांच्या जाळ्यात कोणताच उमेदवार लागत नसल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर होत नाही, तोपर्यंत उमेदवारांची योग्य काळजी पॅनल प्रमुखांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे.

आमचाच होणार सरपंच
पुणे जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर होऊन 10 फेब्रुवारीपर्यंत ग्रामपंचायतींचे कारभारी ठरणार आहेत. अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध तर काहींसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडले. काही ठिकाणी तक्रारी उभ्या ठाकल्याने आरक्षण सोडत निवडणुकीनंतर जाहीर करण्याचे निश्‍चित झाले. सर्वांचीच प्रतिष्टा पणाला लागली. आरक्षणाचा चांगलाच परिणाम निवडणुकांवर दिसून आला. त्यानंतर आता आमचाच होणार सरपंच असे म्हणत दावे-प्रतिदावे राजकीयनेते मंडळींमध्ये सुरू झाले आहेत.

पूर्वीचेच आरक्षण पडू दे रे देवा…

आता सरपंच निवड होणार असून कुठल्या प्रवर्गाला आरक्षण सुटणार? याची चिंता वाढली आहे.त्यानुसार जह्यातील ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतर, आता सरपंच पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. दरम्यान, सरपंचपद मिळावेम्हणून इच्छुकांनी पॅनल व आघाडी प्रमुखांच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. काही जण म्हणतात, पूर्वीचेच आरक्षण पडू दे रे देवा, असे साकडेघालताना दिसत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.