पुणे जिल्हा : पाठिंब्यासाठी वाल्हे गावासह आठवडे बाजारही आज बंद

वाल्हे (वार्ताहर) – केंद्र शासनाने मंजूर केलेला कृषी कायदा रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी वाल्हे (ता. पुरंदर) गाव मंगळवारी (दि. 8) पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीच्या सीमांवर गेल्या काही दिवसांपासून बळीराजाने धडका मारायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने नुकतेच पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अभूतपूर्व असे आंदोलन छेडले असून दिल्लीच्या सीमांवर हे शेतकरी आता तळ ठोकून आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून या शेतकऱ्यांना दिलासा देणारा कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे अखेर या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा देत भारत बंद पुकारला आहे.

त्यात वाल्हेचे ग्रामस्थ सहभागी होणार असल्याचा एकमुखी निर्णय श्रीकृष्ण मठ येथे झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेसह, इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तरी गावातील सर्व नागरिकांनी व सर्व व्यापारी बांधवांनी आणि शेतकऱ्यांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोर्चा काढणार

दर मंगळवारचा भरणार वाल्हे गावचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला असून, तो बुधवार (दि.9) भरविण्यात येणार आहे. तर मंगळवारी सकाळी नऊ वाजता महात्मा फुले पुतळा वाल्हे येथून मोर्चा सुरू होऊन, भैरवनाथ मंदिरात त्याचे सभेमध्ये रुपांतर होऊन मोर्चा विसर्जित होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.