पणदरेत गावकऱ्यांकडून मिरवणूक, सत्कार
माळेगाव – पणदरे (ता. बारामती) येथील संकेत राहुल गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करीत थेट सहायक गटविकास अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. यानिमित्ताने संकेत गायकवाड यांची मिरवणूक काढत ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते ऍड. एस. एन. जगताप, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद जावळे, महेंद्र साळवे, तानाजी भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपसरपंच सत्यजीत जगताप, चंद्रकांत जावळे, ग्रामस्थ उपस्थित होते.
संकेत यांचे प्राथमिक शिक्षण पणदरे येथील प्राथमिक शाळेत तर उच्च माध्यमिक शिक्षण नव महाराष्ट्र विद्यालय पणदरे आणि महाविद्यालय शिक्षण बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात झाले आहे. त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे बी. टेकचे शिक्षण पूर्ण केले आहे.
2020 मध्ये घेतलेल्या एमपीएससी परीक्षेत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले आहे. संकेत गायकवाड यांचे वडील बजरंगवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
आई गृहिणी असून एक भाऊ एमबीबीएस शिक्षण घेत आहेत. युवकांनी उच्च शिक्षण घेत गावाचे नाव उज्जवल करावे, असे मत त्यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले. अमोल गायकवाड यांनी आभार मानले.