सासवडमध्ये बैठकीत ठराव : सोमवारी निर्धार मेळावा
सासवड – विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवार (दि.३०) आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा पुरंदरच्या जागा लढवण्यासाठी सक्षम असून आम्ही पुरंदर विधानसभेची जागा मागणीचा ठराव केला आहे. तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवला असल्याचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ यांनी सांगितले.
सासवड येथे मेळाव्याच्या नियोजनासाठी तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली सासवड येथे राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, सर्वांनुमते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा दिगंबर दुर्गाडे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी, असे ठरविण्यात आले आहे. यावेळी पुरंदर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा वंदना जगताप, पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामन जगताप, राष्ट्रवादी पुणे जिल्हा सेवादल अध्यक्षा परविन पानसरे, सासवड शहर राष्ट्रवादी अध्यक्षा निताताई सुभागडे, राष्ट्रवादी जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्षा प्रिती जगताप, पुरंदर तालुका महिला राष्ट्रवादी उपाध्यक्षा नलिनी कामथे, मार्केट कमेटी चेअरमन शरद जगताप, युवक अध्यक्ष अमित झेंडे, विद्यार्थी राष्ट्रवादी काॅग्रेस अध्यक्ष संदेश पवार, राजेंद्र धुमाळ, पिंकु माहुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरंदरमध्ये अजित पवार यांच्या विचाराचा राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार करण्यासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे शरद जगताप यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव
नगर विकास खात्यामार्फत सासवड नगरपालिका पाणी पुरवठा योजनेसाठी १४२ कोटी नारायणपूर येथील प्राचिन नागेश्वर मंदिराच्या विकासासाठी पुरातत्व विभागामार्फत ६ कोटी १६ लाख रूपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आल्याची माहीती वामन जगताप यांनी दिली.