भाटघर – भाटघर धरण शेजारील न्यू इंग्लिश स्कूल, संगमनेर (ता. भोर) शाळेत माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३२ वर्षांनी शाळा भरवली. इयत्ता दहावीची १९९१ – ९२ या शैक्षणिक वर्षातील ही बॅच होती. ३२ वर्षांनी एकत्रित आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
यावेळी एकूण ६० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या ६० विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी इंजिनियर, उद्योगपती, शेतकरी, डॉक्टर, व्यावसायिक, सरकारी सेवेत, शिक्षक व आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील १ विद्यार्थी शिवाजी गोरड हा दुबई येथे नोकरीनिमित्त असून त्याने मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉल करीत वर्गमित्रांशी संभाषण केले.
गेट-टुगेदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीत झाले. सकाळी चहा, नाश्ता तर दुपारी स्नेहभोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याला फेटे बांधून सन्मानचिन्ह देण्यात आले. या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत साहित्याच्या रूपाने शाळेला भेटवस्तू दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सुभाष शिंदे, बाळासाहेब नवले, साहेबराव बोरकर, वराळे, भुतकर, रमेश बुदगुडे, रोहिदास जगताप, लोखंडे, जगताप मॅडम तसेच शाळेचे शिपाई मारुती सुतार उपस्थित होते. या कार्यक्रमाची संकल्पना रमेश बांदल, संतोष गोरड, गोरक्षनाथ गोरड, प्रसाद वीर, विठ्ठल वीर, रामदास भडाळे, शिवाजी ओंबळे, प्रमोद गोळे या माजी विद्यार्थ्यांची होती.