आमदार जगताप : आंबेगाव बुद्रुक परिसरात प्रचारार्थ पदयात्रा
कोंढवा – आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एका वर्षात सोडविणार असून, यासाठी खडकवासला आणि भामा आसखेड धरणामधून भूसंपादनासह 390 कोटींची योजना महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक कमिटीच्या मान्यतेला सादर आहे. त्यामुळे या परिसराचा पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न सुटणार आहे, अशी ग्वाही पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे (काँग्रेस) उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय जगताप यांनी दिली.
आंबेगाव बुद्रुक (ता. हवेली) परिसरात रविवारी (दि. 10) संजय जगताप यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पदयात्रा, कोपरा बैठकीतून झंझावाती प्रचारदौरा केला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून युवक, नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत प्रोत्साहन दिले. येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव पठार, जांभूळवाडी, कोळेवाडी परिसरात दौरा केला. अनेक संस्था, संघटनांनी जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी उद्धव दांगट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अनिल दळवी, उपसरपंच गणेश कोंढरे, तानाजी दांगट, नीलेश कोंढरे, अनिल कोंढरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. संपूर्ण आंबेगावातील मतदार जगतापांच्याच पाठीशी राहील, असा विश्वास गणेश कोंढरे यांनी दिला.
गणेश कोंढरे म्हणाले की, आमदार जगताप यांनी करोनाकाळासह केलेल्या विकासकामांचे पदयात्रेदरम्यान नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. त्यामुळे आमदार जगताप यांचा आत्मविश्वास आणखी वाढला असून आंबेगाव परीसरातील वाहतूक कोंडीबाबत एकात्मिक वाहतूक आराखड्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करीत असल्याचे सांगत सुनियोजित विकासासाठी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन गणेश कोंढरे यांनी केले.
गेली पाच वर्षे आमदार जगताप यांचे मतदारसंघातील हजारो कुटुंबांबरोबर जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. त्यामुळेच त्यांना शहरी व ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आपण महाविकास आघाडीचा आणि विकासाचा चेहरा म्हणून ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे समाजातील अनेक संघटनांही त्यांच्या पाठीशी उभ्या राहत आहेत.
– गणेश कोंढरे, उपसरपंच, आंबेगाव बुद्रुक