पुणे जिल्हा: मंडलाधिकाऱ्यांना घातली कांद्याची माळ

ओतूर येथे शिवसैनिकांकडून केंद्र शासनाच्य निर्णयाचा धिक्‍कार

ओतूर -सोन्याचे गोफ घालणारा शेतकरी राजा आता कांद्याच्या माळा घालतोय याला जबाबदार असणाऱ्या केंद्र शासनाच्चा धिक्‍कार असो, असे म्हणत शिवसैनिकांनी ओतूरचे मंडलाधिकारी डी. एस. लंवाडे यांना कांद्याची माळ घातली.

केंद्र सरकारने तात्काळ कांदा निर्यात बंदी उठवून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा या आग्रही मागणीसाठी व केंद्राच्या निर्यातबंदी धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी (दि. 16) ओतूर येथे जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने हि निर्यात बंदी न उठवल्यास शेतकरी हितासाठी शिवसेनेच्यावतीने पुढील काळात अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, मंडल अधिकारी डी. एस. लवांडे यांनी महसूल विभागाच्या वतीने निवेदन स्वीकारले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, जिल्हा सल्लागार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, तालुका प्रमुख माउली खंडागळे, उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, उपसभापती रमेश खुडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. केंद्र सरकारने लादलेली कांदा निर्यातबंदी तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मुक्‍त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.