नागरिकांच्या भेटीगाठी, गावागावात नेत्यांचे कार्यकर्त्यांचे दौरे सुरू
लाखणगाव – आंबेगाव विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आमदार म्हणून निवडून येण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे. आपापल्या मतदारसंघातील कार्यकर्ते जपणे आणि नाराज कार्यकर्ते यांची समजूत काढणे, यावर उमेदवारांनी भर दिल्याचे दिसून येते.
मतदानाच्या वेळी आपल्याला चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळाला पाहिजे आणि आपण आमदार म्हणून निवडून आलो पाहिजे. यासाठी सर्व इच्छुकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. ज्या उमेदवारांची तिकिटे फिक्स होतील ते उमेदवार व जे उमेदवार कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच याच दृष्टीने तयार होते. अशा उमेदवारांची प्रचाराच्या दोन-दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातही निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये प्रचाराच्या दौऱ्यांनी वेग घेतला आहे. हे दौरे होत असताना या ठिकाणी सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील महायुतीकडून फिक्स उमेदवार आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रचाराच्या काही फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून वळसे पाटील स्वतः व कुटुंबीय निवडणूक प्रचारात सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झालेली नसली तरीही ही जागा महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला सुटेल आणि या पक्षाच्या वतीने भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम मागील सहा महिन्यापासून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत.
एकंदरीत सध्यातरी उमेदवारांच्या प्रचार मोहिमांबरोबर नाराज कार्यकर्ते आपापल्या बाजूने खेचण्यासाठी एक प्रकारची स्पर्धा सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. वळसे पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. या मोठ्या फौजेमुळे नाराजांची संख्याही जास्त आहे. दुसरीकडे निकम यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज नाही. परंतु नाराज असणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एकंदरीतच सध्यातरी आंबेगाव तालुक्यामध्ये प्रचाराबरोबरच कार्यकर्त्यांची समजूत काढून सोबत घेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
दुसरीकडे उद्योजक रमेश येवले हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक आहेत. आमदारकीच्या तिकिटासंदर्भात त्यांनी सुद्धा मुलाखत पक्षाकडे दिली आहे.शिवसेना उबाठा पक्षाकडून सुरेशभाऊ भोर हे सुद्धा इच्छुक आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये रमेश येवले यांनी केलेली तयारी पाहता ते तिकीट न मिळाल्यास अपक्ष ही निवडणूक लढण्याची चिन्हे दिसून येतात. परंतु सध्यातरी आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटात समोरासमोर लढाई होणार असून या लढाईमध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व भीमाशंकरचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्यात लढाई होणार असून मागील सहा महिन्यापासून या निवडणुकीच्या दृष्टीने दोघांनीही तयारी केली आहे.
नाराजांची मनधरणी…
सध्या या दोन्ही उमेदवारांना आपल्या पक्षाचे बळ वाढवण्यासाठी आणि नाराज कार्यकर्ते एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वळसे पाटील १९९० सालापासून गेली ३५ वर्षे आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व करतात.या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर विकास त्याचप्रमाणे गावोगावी अनेक कार्यकर्तेही तयार केले आहेत. परंतु एकाच गावात कार्यकर्ते जास्त दिसून येतात. एकच कार्यकर्त्याला सत्तेची अनेक पदे या पद्धतीमुळे बाकीचे कार्यकर्ते नाराज असल्याचे ही चित्र तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळे अशा नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना निवडणूक प्रचारात सक्रिय करण्यासाठी वळसे पाटील यांचे प्रयत्न सुरू आहे.
निकम यांचे शर्थीचे प्रयत्न…
दुसरीकडे देवदत्त निकम यांची तालुक्यात वळसे पाटील यांच्या विरोधात असणारे सर्व कार्यकर्ते एकत्र करून वळसे पाटील यांना शह देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच गावागावातील एकमेकांवर नाराज असणारे कार्यकर्ते यांना एकत्र करून आपल्या बाजूने आणण्यासाठी त्यांचेही प्रयत्न सुरू आहे.