निमोणे –निष्ठावंत माणसांना समाज हा नेहमीच आपल्या ह्रदयात, मनात स्थान देतो, तर गद्दारी करणार्यांना सर्वसामान्य लोक समाजातून हद्दपार करत असतो, हा इतिहास आहे. सध्या शरद पवार साहेबांच्या विचारांशी गद्दारी करुन तालुक्यातील अनेक महाठग विरोधकांना जाऊन मिळाले आहेत.
एक प्रकारे निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक असून पवार साहेबांशी गद्दारी केलेल्यांना मतदार कधीही स्विकारणार नाही, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे उमेदवार अशोक पवार यांनी केले.
करडे (ता. शिरूर) येथे विधानसभा प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी सरपंच सुनील इसवे, दत्तात्रय देशमुख, विजय कुमार जगदाळे, अतुल बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे यांसह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, सध्या पैशाच्या जोरावर तरुणांची माथी भडकवणे, हेच या गद्दारांचे प्रमुख काम बनले आहे. मात्र सुशिक्षित तरुणांनी अशा गद्दारांच्या अमिषाला बळी पडु नये असे आवाहन ही पवार यांनी केले.
चासकमानचे पाणी करडेत आणणार
औद्योगिक वसाहती मुळे करडे गाव आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाले आहे; मात्र येथील शेती व शेतकरी अद्यापही हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. सध्या चासकमानच्या अस्तरीकरणासाठी निधी मंजूर आहे, यामुळे एक आवर्तन वाढीव मिळणार आहे. त्यामुळे करडे येथे सर्व्हेक्षण करुन चासकमानचे पाणी काही भागात आणता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे भविष्यात येथील शेती बारामाही बागायती करता येणार आहे, असे आमदार पवार म्हणाले.