केंद्रीय मंत्री गडकरींकडे भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाचे निवेदन
सासवड – सासवड (ता पुरंदर) येथून श्रीसंत सोपानकाका महाराज व श्रीसंत चांगावटेश्वर महाराज पालखी पंढरपूरच्या वारीसाठी जात असतात हे पालखी मार्ग केंद्र सरकारने ताब्यात घ्यावेत व रस्याचे रुंदीकरण करून वारकऱ्यांचा मार्ग सुखकारक करावा, या मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिले.
पुणे ते पंढरपूर पालखी मार्गाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांचे कल्पनेतून आणि पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे. पुणे जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्याशिवाय संत सोपानकाका व संत चांगावटेश्वर महाराजांची महत्वपुर्ण पालखी पंढरपूरला जात असते. त्या पैकी संत सोपानकाका यांची पालखी सासवड पांगारे, मांडकी. निंबुत, को-हाळे बु. बारामती, लासुर्णे, निरवांगी, अकलूज, भडी शेगाव, वाखरी मार्गे ही पालखी पंढरपूरला जाते.
तसेच संत चांगावटेश्वर पालखी अनुक्रमे सासवड, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव, वाघापूर, शिंदवणे मार्गे बोरीऐंदी त्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी मार्गे जात असते. सध्या हा रस्ता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या मार्गाची सुधारणा करण्यासाठी तो केंद्राकडे वर्ग करून घेत त्याचेही रूंदीकरण आणि मजबुतीकरण काम करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
शिष्टमंडळात राज्याचे माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस ऍड. श्रीकांत ताम्हाणे, सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेशचे श्रीकांत थिटे, वाल्हे गावचे नेते आदेश भुजबळ उपस्थितीत होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना श्री संत सोपानकाका व चांगा वटेश्वर महाराज यांचा इतिहास सांगण्यात आला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिल्या नंतर त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
– ऍड. श्रीकांत ताम्हाणे, सरचिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा