दिवे : भारनियमनाच्या दिवशी संपूर्ण दिवसभर विद्युतपुरवठा बंद ठेवणे, इतर दिवशी वेळी अवेळी विद्युतपुरवठा अचानक खंडित करणे, नागरिकांशी सुसंवाद न ठेवता त्यांच्याशी जाणीवपूर्वक खोडसाळपणाची वागणूक देणे, विजेची बिले व्यवस्थित न देणे, जादा बिले वाढवून देणे, तसेच बिल कमी करण्यास आलेल्या ग्राहकांशी विनाकारण वाद घालणे, विद्युत व्यवस्थेचे कोणतेही वेळापत्रक न जाहीर करणे, मीटरचे फोटो न काढता परस्पर बिलाच्या पावत्या बनविणे अशा सर्व गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. नागरिकांनी तक्रारी करूनही अधिकारी मात्र त्यांच्याच विचारावर ठाम असल्याने पुरंदर तालुक्यातील नागरिक पूर्णपणे वैतागले आहेत. त्यामुळे अशा मनमानी कारभारातून सुटका कधी होणार ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड आणि परिसरातील गावांसाठी विद्युतपुरवठा करण्यासाठी यापूर्वी सासवड आणि बोपगाव अशा दोन ठिकाणी सबस्टेशन होते. ग्रामीण भागात विद्युतपुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी दिवे आणि बेलसर येथे सबस्टेशनचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु सबस्टेशन स्वतंत्र करताना स्वतंत्र लाइन असणे आवश्यक आहे; परंतु अधिकार्यांनी येथे मनमानी करीत एकाच 33 केव्हीच्या लाइनवरून विद्युतपुरवठा सुरू केला आहे.
परिणामी लाइन एकच आणि गावांची संख्या वाढल्याने वितरण व्यवस्थेचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. एकाच लाइनवरती जास्त लोड येवून तार तुटणे, जम्प जाणे तसेच ओव्हरलोड होवून विद्युतपुरवठा खंडित होणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत.
बिलाच्या रीडिंग बाबत कोणतीही दक्षता नाही
वीज ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेण्यासाठी खासगी व्यक्तीला ठेका देण्यात आल्यानंतर या व्यक्तीने कोणताही अनुभव नसलेले कर्मचारी बिलाचे रीडिंग घेण्यासाठी कमी पगारावर नेमले आहेत, परिणामी कोणताही अनुभव नसलेले कर्मचारी बिलाचे रीडिंग कसे घ्यावे, नागरिकांशी संवाद कसा करावा याबाबत अनभिज्ञ असलेले दिसून येत आहेत. बिलिंगबाबत चुकीची रीडिंग घेतले जात असून रीडिंग घेणार्या कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी कोणतेही देखरेख करीत नाहीत. तसेच फोटो पंच करून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
परस्पर विद्युत जोड कापणे आणि वसुली करणे
एखाद्या ग्राहकाने बिल भरले नसेल तर पुढील वेळेस त्यास दोन्ही बिले, व्याज, दंड असे सर्व मिळून पुन्हा बिल भरावे लागते. असे असताना विद्युत कर्मचारी बिले वसुलीच्या नावाखाली ग्राहकांचे वीज जोड परस्पर कट करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यापूर्वी वीज कनेक्शन परत जोडताना जादा पैसे घेतले जात नव्हते. परंतु आता काहीही न बोलता वीज बिलात जवळपास 250 रुपये जोड आकारणी वसूल केले जातात. त्यामुळे ही सावकारकी कधी थांबणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वीज ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापूर्वी विद्युत व्यवस्थेत ज्या अडचणी होत्या त्या दुरुस्त करण्यात येत आहेत. ग्राहकांना ऑनलाइन बिले देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अदानी कंपनीकडून नवीन वीज मीटर बसविण्यात येणार असून कर्मचारी तुमच्याकडे न येता मीटरचे रीडिंग होईल आणि त्याचे बिल मोबाइल वरती दिसेल. त्याचबरोबर सध्या जास्त लोड असल्याने सकाळी सर्वत्र दररोज एक तास भारनियमन करण्यात येत आहे. दिवे आणि बेलसर येथून दोन स्वतंत्र लाइन करण्यात येणार असून काही दिवसांत भारनियमनाचा प्रश्न मिटेल.
– गणेश चांदणे, उपकार्यकारी अभियंता, सासवड विभाग