सविंदणे – शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी अखेर गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. दोन दिवस रात्रदिवस अथक परिश्रम घेत बेलापूर पंचशिल परिसरात त्याचा मागोवा घेत अट्टल गुन्हेगाराला गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शिरूर शहरातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून तिघा चोरट्यांनी (दि.२०) एप्रिल रोजी दोन लाख रुपयांची रोकड व पद्मावती देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. अनेक ठिकाणी यांनी चोऱ्या केल्या होत्या. तिघांना गजाआड करून रबाळे पोलिसांनी त्यांची रवानगी तळोजा कारागृहामध्ये केली होती.
दरम्यान, शिरूरमधील मंदिरातील चोरीप्रकरणी अधिक तपासाकामी तिघांना शिरूरला आणले होते. शिरूरमधील तपासानंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांच्या पथकासह पुन्हा तळोजा कारागृहामध्ये नेले जात असताना कारागृहापासून काही अंतरावर मुजाहीद गुलजार खान (रा. कारेगाव, ता. शिरूर) याने लघुशंकेचा बहाणा करून वाहन थांबविण्यास भाग पाडले. आडोशाला जाताच पोलिसांना हिसका मारून पळून गेला होता. त्यानंतर शिरूर पोलिसांसह, क्राईम ब्रँच, तेथील स्थानिक पथक त्याचा शोध घेत होते.