पुणे -गेली काही महिन्यांपासून आमदार दिलीप मोहिते यांनी प्रतिष्ठेचा विषय केलेल्या तहसीलदारांना लवकरच खेड तालुका सोडावा लागणार असल्याचे दिसते आहे. याचे कारण म्हणजे जिल्हा प्रशासनात आता तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहेत. प्रामुख्याने खेड, हवेली आणि मुळशी या तीन तहसीलदार यांच्या बदलीची जोरदार चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे.
खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्यावर आमदार मोहिते यांनी थेट आरोप केले केले होते. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत नेऊनदेखील पुढे काहीच कारवाई होत नसल्याने आमदार दिलीप मोहिते प्रचंड नाराज झाले होते. प्रसंगी मोहिते यांनी बंडाचे निशाण फडकाविण्याची तयारी दर्शवली. सध्याच्या परिस्थितीवर त्यांची नाराजी परवडणारी नसल्याने या प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेल्याचे दिसतेय.
स्थानिक आमदारांनी तहसीलदार यांच्या कामकाजासंदर्भात व्यक्त केलेली नाराजी तसेच नागरिकांच्या तक्रारी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बदल्यांची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जे तहसीलदार बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांनी पालकमंत्री पवार यांना बदली थांबविण्यासाठी विनंती केल्याचे समजते. तर काही अधिकाऱ्यांनी तासन्तास थांबून आमदारांची मनधरणी केल्याचे समजते. त्यामुळे यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.
मागील अनेक दिवसांपासून तहसीलदारांच्या बदलीची चर्चा सुरु आहे; मात्र या ना त्या कारणामुळे त्या लांबणीवर गेल्या आहेत. जिल्ह्यात रिक्त असलेली अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि काही उपजिल्हाधिकारी दर्जाचे पदांवर नियुक्ता करण्यात आल्या आहेत. मात्र तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश अजूनही निघाले नाहीत. या बदलीच्या आदेशांवर मुख्यमंत्र्यांची सही होणार असल्याने बदलीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
काही अधिकारी मॅटमध्ये जाणार?
बदलीच्या ठिकाणी आपली नियुक्ती व्हावी, यासाठी काही अधिकाऱ्यांनी सेटिंग लावली आहे. संबधित लोकप्रतिनिधींची शिफारसपत्रे सुद्धा घेतली असल्याचे समजते. तर बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांनी आपली बदली रोखण्यासाठी वेळप्रसंगी मॅटमध्ये जाण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते.