आडाचीवाडीत गुलाल उधळून खणानारळाने पाण्याची भरली ओटी
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील पिंगोरी, कवडेवाडी खो-यामध्ये मागील काही दिवसांत संततधार पाऊस झाल्याने वाल्हे गावच्या बाजुने वाहणार्या ओढ्यावरील जवळपास 22 बंधारे भरून ओसंडून वाहू लागले आहेत. या ओढ्यावरील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांच्या शेती सिंचनाचा प्रश्न परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. भुगर्भाची पाणी पातळी उंचावल्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल यांची पाणी पातळी दिवसेंदिवस वाढू लागल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
आडाचीवाडी येथे रविवारी(दि.1) सायंकाळी पुणे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्यासह ग्रामस्थांनी गुलाल उधळून ग्रामदैवतेचा जयघोष करत खणानारळाने पाण्याची ओटी भरत जलपूजन केले. मागील वर्षी अतिअल्प पर्जन्यमान झाल्याने पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली होती. मागील वर्षी ओढे-नाले, बंधारे ऐन पावसाळ्यात कोरडेठाक होते. त्यामुळेच मागील वर्षी ऐन पावसाळ्यापासूनच पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षी मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस पडल्याने अनेक गावातील ओढे-नाले, बंधारे भरले असून जमिनीतील पाणीपातळीत वाढ होत आहे.
याप्रसंगी,माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार,आडाचीवाडी सरपंच सुवर्णा पवार, आडाचीवाडी उपसरपंच शकुंतला पवार,वागदरवाडी सरपंच सुनिल पवार, सुकलवाडी सरपंच संदेश पवार,वाल्हे माजी उपसरपंच सुर्यकांत पवार,दिलीप पवार, हनुमंत पवार,बजरंग पवार,विकास पवार, प्रशांत पवार,अरविंद पवार, दीपक कुमठेकर, त्रिंबक भुजबळ,तुषार पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
वाल्हे परिसरामध्ये अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही. मात्र, पिंगोरी, कवडेवाडी परिसरामध्ये झालेल्या पावसाचे ओढ्याद्वारे पाणी आले आहे. पश्चिमेकडील भागात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे वाहून जाणारे सर्व पाणी अडविण्यासाठी आपण सगळे यशस्वी झालो आहोत.
– प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक