आरक्षण, उमेदवारीसाठी सर्वपक्षीयांनी बांधला चंग
मयूर भुजबळ
तळेगाव ढमढेरे – जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत.त्यामुळे तळेगाव ढमढेरे – पिंपरी सांडस गटात अनेक इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली आहेत. परंतु आरक्षण कसे आणि कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक नवीन चेहरे निवडणुक मैदानात उतरण्याची शक्यता आहे. परंतु इच्छुकांची गर्दी रोखण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश येणार का? तसेच उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची यासाठी सर्व पक्षीयांचा कस लागणार आहे.
तळेगाव ढमढेरे-पिंपरी सांडस जिल्हा परिषद गटात तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, धानोरे, दरेकरवाडी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, पारोडी, दहिवडी, उरळगाव ही गावे समाविष्ट आहेत. सध्या येथे जिल्हा परिषद गट आणि दोन्ही पंचायत समिती गणावर अपक्षांचे वर्चस्व आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार अपक्ष उभे राहण्याची तयारी करीत आहेत.
गेल्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल यांनी त्यांच्या पत्नी रेखा बांदल जिल्हा परिषद गटातून अपक्ष निवडून आणले होते. यावेळी ते न्यायालयीन कक्षेत अडकलेले असतनासुद्धा समर्थक तरीही आगामी निवडणुकीची तयारी जोरात करीत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा आदर्श घेऊन जिल्हा परिषद गटात त्याच अवलोकन करून तीन पक्ष एकत्र येऊन त्रिपक्षीय एकच उमेदवार देणार कि वेगवेगळे लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्यावेळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या तळेगाव ढमढेरे-पिंपरी सांडस गट व दोन्ही पंचायत समिती गणाला अपक्षांनी सुरुंग लावला होता.त्यामुळे यंदा पक्षीय होणारी बंडखोरी रोखली जाऊ शकेल का? असा सवाल नागरिकांना पडला आहे. यावेळी सगळेच पक्ष आपापले उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.
तर अनेक इच्छुक उमेदवार मागील अनुभवानुसार अपक्ष तयारी करीत आहेत. तर काही उमेदवार जनतेच्या मनात नक्की काय चाललय हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या निवडणूक व आरक्षण जाहीर होण्याआधीच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने इच्छुकांची मर्जी राखणे हे पक्षश्रेष्ठींपुढे मोठे आव्हान आहे.
कोणाच्या गळ्यात माळ पडणार?
तळेगाव ढमढेरे-पिंपरी सांडस जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस 10, भाजप 6, कॉंग्रेस 4, शिवसेना 3, मनसे 2, इतर 4 व अपक्ष 6 असे एकूण 35 जण इच्छुक आहेत. तसेच या सर्वांनी आपआपल्या पद्धतीने निवडणूकीसाठी जोर धरला आहे; परंतु निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी इच्छुकांमध्ये धाकधूक वाढू लागली आहे; परंतु इच्छुकांच्या भाऊगर्दीत पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात माळ घालणार याकडे इच्छुकांच्या नजरा
लागल्या आहेत.