पुणे जिल्हा: सानुग्रह अनुदानासाठी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

बारामती नगरपालिकेसमोर घोषणाबाजी : कर्मचारी संतापले

बारामती/ जळोची -बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवार (दि.12) सानुग्रह अनुदानासाठी पालिकेच्या आवारात काळ्या फिती लावून ठिय्या आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

नगरपालिकेच्या वतीने पालिका कर्मचाऱ्यांना 2013 पासून प्रतिवर्षी दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यात येते. मागील वर्षी कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. मात्र यंदा करोनाच्या साथीत स्वतःचा जीव धोक्‍यात घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.

या पार्श्‍वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यंदा 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी केली होती. या मागणीला नगराध्यक्षांनी सकारात्मकता दर्शवली होती. मात्र, याबाबत पालिकेत झालेल्या बैठकीत सत्ताधारी नगरसेवकांच्या मतभेदामुळे यावर तोडगा निघाला नाही. यासाठी पालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

नगरपालिकेत सानुग्रह अनुदानासाठी झालेल्या बैठकीत मोठ्या संख्येने कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. मागील वर्षी 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. ते यंदा 25 हजार रुपये मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

या मागणीला नगराध्यक्षांनी होकार दिला होता. मात्र, त्यानंतर नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, नगरसेवक यांच्यात झालेल्या बैठकीत सानुग्रह अनुदानाबाबत काहीतरी मार्ग काढू, असा सूर निघाल्याने यंदा अनुदान मिळेल की नाही. अशी शंका निर्माण झाली आहे.

त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला. यावेळी पालिकेकडून अनुदान मिळण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे, अशी, माहिती पालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी दिली.

2013 पासून कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची पद्धत आहे. मात्र यंदा कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्‍यात घालून कामे केली आहेत. त्यामुळे यंदा 25 हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी आहे. याबाबत नगरपालिका सकारात्मक नसल्यामुळे हे आंदोलन आम्हाला करावे लागत आहे.
– राजेंद्र सोनवणे,
आरोग्य निरीक्षक, नगरपालिका, बारामती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.