Pune District: रयतेचे राज्यासाठी शिवाजी महाराज झगडले

नारायणगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीचे मावळे एकत्र करून जनसामान्यांचे आपले राज्य, रयतेचे राज्य व्हावे यासाठी स्वतः झगडले पाहिजे हा विचार घेऊन स्वराज्य निर्माण केले असे विचार शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केले.दरम्यान, शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी नारायणगाव ते जुन्नर शिवज्योत मोटर सायकल रॅली मध्ये 400 शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उत्तर पुणे जिल्ह्यातील तिथीप्रमाणे सर्वात मोठी युगप्रवर्तक छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती सोहळा राजा शिवछत्रपती प्रवेशद्वार येथे मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी बानुगडे-पाटील बोलत होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटे यांनी दिली. याप्रसंगी आमदार शरद सोनवणे, माऊली खंडागळे, सुधीर खोकराळे, राहुल नेवसे, दिलीप गांजाळे, संध्या भगत, संजय वारुळे, बाळासाहेब पाटे, सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, आशा बुचके, संतोष खैरे यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आदी मान्यवर, शिवभक्त उपस्थित होते.
तिथीप्रमाणे साजरी करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात शनिवार (दि.15) ते सोमवार (दि.17) स्वराज्य उभारणीत योगदान असणार्या व अटकेपार झेंडे फडकविणार्या मराठा सरदारांचे शिवकालीन शस्त्र, ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन, जोर बैठक दंड, दोरी उडी स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, शिवज्योत रॅली व शिवशाहीर चंद्रकांत माने यांचा शिवगीत व पोवाडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांसह आमदार शरद सोनवणे यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मेहबूब काझी, हेमंत कोल्हे , अजित वाजगे तर आभार ज्ञानेश्वर औटी यांनी मानले.





