माऊली खंडागळे : महाविकास आघाडीची मांजरवाडी कोपरा सभा
नारायणगाव – महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना विधानसभेत पाठविण्यासाठी जुन्नर तालुक्यातील शिवसैनिक जिवाचे रान करील, असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी व्यक्त केला.
सत्यशील शेरकर यांचा प्रचारार्थ मांजरवाडी झालेल्या कोपरा सभेत माऊली खंडागळे बोलत होते. यावेळी खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव व मांजरवाडी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शरद लेंडे, उद्योजक डी.आर.थोरात, उपसरपंच संतोष मोरे यांची भाषणे झाली.
शरद लेंडे म्हणाले की, शरद पवार यांच्या माध्यमातून जुन्नर तालुका सुजलाम् सुफलाम् झाला आहे. शरद पवार यांनी दिलेले उमेदवार सत्यशील शेरकर हे तरुण, तडफदार, होतकरू आणि शेतकर्यांच्या प्रश्नांची जाण असलेले व्यक्तिमत्व आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार मोहीम सुरु केल्याने सत्यशील शेरकर यांना मताधिक्य मिळणार, असा विश्वास शरद लेंडे यांनी व्यक्त केला. सरपंच सारिका गायकवाड यांनी आभार मानले.
विकासाच्या बाबतीत जुन्नर तालुक्याला वेगळ्या उंचीवर न्यायचे असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. शेतकर्यांना मोफत वीज, पाणी, रस्ते आणि आरोग्य या गरजांवर प्रामुख्याने काम करायचे आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, शेतीमालासाठी उद्योग प्रक्रिया प्रकल्प तयार करणे, तालुक्यातील बिबट्याचा प्रश्न सोडविणे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा मानस आहे.
– सत्यशील शेरकर, उमेदवार, महाविकास आघाडी