जेजुरी : कुलदैवत खंडेरायाचा माघ पौर्णिमा उत्सव धार्मिक विधी कुलधर्म कुलाचार करत उत्साहात पार पडला. राज्याच्या विविध प्रांतातून आलेल्या बहुजन बांधवांनी देवभेट सोहळा पार पाडला तर उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या खंडोबा भाविकांनी विविध वाद्यांच्या तालात वाजत गाजत भंडार्याची उधळण करीत ग्रामदैवत हनुमान मंदिर व चावडीला मान देत विविध रंगांच्या रेशमी वस्त्रे, मोरपिसानी सजविलेल्या शिखरी काठ्या गडावर दाखल करीत ठरवून दिलेल्या वेळेत मुख्य मंदिराच्या कळसाला टेकवल्या आणि माघ पौर्णिमा उत्सवाची सांगता झाली.
माघ पौर्णिमेच्या निमित्ताने संगमनेर येथून येणारी मानाची होलम राजाची काठीची शिखर भेट सकाळी ठीक 11 वाजता करण्यात आली. यावेळी मल्हारी मार्तंड खंडोबा होलम राजा देवस्थान, संगमनेरचे अध्यक्ष- काटे महाराज यांचा सत्कार देवसंस्थांचे विश्वस्त अॅड. विश्वास पानसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या उत्सवाच्या निमित्ताने संगमनेरचे आमदार अमोल खताळ श्री खंडोबा मंदिरामध्ये या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांचाही सत्कार देवसंस्थानच्या वतीने करण्यात आला. यंदाचे वर्षी प्रथम शिखराला प्रथम काठी टेकविण्याचा मान संगमनेरकर यांचा होता. त्यानंतर दुपारी 1 वाजता सुपे येथील खैरे पाटील यांची व जेजुरीमधील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मानाची काठी शिखर भेट करण्यात आली.
यावेळी खैरेपाटील सुपे यांचे मानकरी शहाजी खैरे, आबा खैरे, शरद खैरे, भगवान खैरे, देविदास भुजबळ, अमोल अपसुंदे, नवनाथ लांडगे, रामनाथ ढिकले व इतर तसेच होळकर काठीचे मानकरी बबनराव बयास, मिलिंद माने, बाळू नातू, देविदास बयास, सचिन नातू, सागर गोडसे या मानकर्यांचा प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते विश्वस्त अॅड. विश्वास पानसे व विश्वस्त मंगेश घोणे, अॅड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. भाविक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अतिशय शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात शिखर भेट झाली. श्री मार्तंड देवसंस्थान प्रशासन व श्री पोलीस स्टेशन प्रशासनाकडून भाविकांच्या सोई सुविधेसाठी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले होते.