बारामती – ती पार्लर साठी घरात आली, घराची चावी चोरली, नंतर घरी कोणी नाही हे पाहून 82 हजार रुपयांच्या दागिनावर तिने डल्ला मारला. शहरातील मळद रोड येथील देवळे पॅराडाईज येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तेजस्विता स्वप्निल जरांडे (वय 32, रा. मळद रोड, बारामती) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास करत आरोपी महिलेला ताब्यात घेतले व मुद्देमाल जप्त केला.
संसाराला हातभार लागावा म्हणून घरामध्ये लेडीज पार्लर चालवत आहेत. त्यांच्या घरात आजूबाजूच्या महिला पार्लरसाठी येत असतात. घरात साहजिकच महिलांचा वावर असतो. त्यांच्या घराच्या दोन चाव्या असतात एक चावी कायम घराच्या खुंटीवर लटकवलेली असते. एक चावी त्या स्वतःजवळ ठेवतात. त्यांची घरात ठेवलेली चावी ही एक दिवस गायब झाली.
दि. 23 ते 28 जानेवारी दरम्यान त्या कामानिमित्त त्यांच्या मूळ गावी गेल्या. घरामध्ये कुणीही नव्हते. घरातील कपाटाची चावी घरामध्येच होती. घरातील त्यांचे दागिने कपाटात होते. दिनांक 28 जानेवारी रोजी त्या परत आल्या व त्यांनी घरात पाहिले असता त्यांच्या कपाटातील दागिने त्यांना मिळून आले नाही. त्यांनी दुसरी चावी पाहिली असता तीही घरात मिळून आली नाही.
मग त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या घरातील दुसरी चावी कोणीतरी वापर करून दरवाजा उघडून घरातील कपाटाच्या चावी चा वापर करून कपाटातील 14ग्रॅम सोन्याचे गंठण 5.6 ग्रॅम सोन्याची चैन 2.6ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, कपाटात ठेवलेले रोख 5 हजार घरातून चोरी झाले आहेत. त्यानंतर त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यास तक्रार दिली.
पोलिसांनी तात्काळ घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी अनेक महिलांना चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी चौकशी केली असता शेजारील परिसरात राहणाऱ्या महिलेनेच पार्लरमध्ये येऊन फिर्यादीचे लक्ष नसताना घरातील चावी चोरून नेली. तेजस्विता जरांडे गावी गेल्याचे समजतात आरोपी महिलेने घर उघडून वरील वर्णनाचे 82हजार रुपयांचे दागिने व पैसे लंपास केले.
सदर महिलेस पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयात हजर केले. सरकारी वकील राहुल सोनवणे यांनी युक्तिवाद केला. प्रथमवर्ग न्यायाधीश पाटील त्यांनी आरोपी महिलेस पोलीस कस्टडी सुनावली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेने गुन्हा कबूल केला. चोरीस गेलेला सर्व ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी महिलेने पुण्यामध्ये दागिने गहाण ठेवण्यासाठी दिले होते व त्यांच्याकडून ती पैसे घेऊन आलेली होती.
सदर कामगिरी बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, प्रकाश वाघमारे, पोलीस कर्मचारी कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, शिंदे, तुषार चव्हाण, दशरथ इंगवले, अक्षय शिताप जामदार, शाहू राणे, लोकरे मॅडम यांनी केली.