– राष्ट्रवादी काॅंग्रेसने काढली शहरात विजयी मिरवणूक
भोर – भोर विधानसभेच्या झालेल्या चौरंगी निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) उमेदवार शंकर मांडेकर यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा १९९०५ अधिक पोस्टलची २०३ मते अशा एकूण २० हजार १०८ मतांनी पराभव करून भोर विधानसभा मतदार संघात इतिहास घडवला आहे.
या निवडणुकीत शंकर मांडेकर यांनी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतली होती. २४ मतमोजणी फेऱ्यांमध्ये मांडेकर यांनी ५३ हजार मतांपर्यंत आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीत एकूण २ लाख ९१ हजार ७०४ मतांपैकी १ लाख २६ हजार २५२ मते मिळवली. तर संग्राम थोपटे यांना १ लाख ६ हजार ३४७ अधिक पोस्टल ४५० मते मिळाल्याने भोरचे निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ.विकास खरात यांनी शंकर मांडेकर यांना विजयी घोषित केले.
या वेळी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवार शंकर मांडेकर यांची शेटेवाडी चौपाटी येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण करून भोर शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
या विजयाचे सारे श्रेय शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे व भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार किरण दगडे यांनाच जात असून त्यांनी मिळवलेली २८९४८ आणि २५५४९ या निवडणूक निकालात निर्णायक ठरली असून महाविकास आघाडीला अपक्षांनी घेरलं आणि नेमकं तेच शंकर मांडेकरांनी हेरल, आशी चर्चा मतदारांमध्ये रंगत आहेत. या विजयाचे खरे श्रेय मुळशीकरांना जात असून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांचे काम केले नसल्याचीही चर्चा आहे. तर लाडकी बहीण योजना आणि देवयात्रा यांचाही फटका महाविकास आघाडीला बसला असल्याचे बोलले जात आहे.
भोरचे प्रश्न मार्गी लावणार
भोरमधील मतदार राजाने मला विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. यात भोरच्या औद्योगिक वसाहतीचा, साखर कारखान्याचा आणि शेतकऱ्यांच्या हमी भावाचा यात समावेश असून माझ्या विजयाच्या खऱ्या गेमचेंजर लाडक्या बहिणी ठरल्या असल्याचे शंकर मांडेकर यांनी सांगितले.