शिक्रापूर – शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गुंडगिरी, भाईगिरीचे आकर्षण वाढू लागले आहे. युवकांकडून शरीरावर ग्रुपची नावे टाकून विविध पद्धतीने भाईगिरी केली जात असल्याचे वृत्त नुकतेच दैनिक प्रभातने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत शाळा व पोलीस प्रशासनाने पालकांसह ग्रामस्थांची बैठक घेत मुलांना आदेश देत कारवाईचे संकेत दिले आहेत.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका महाविद्यालयात अल्पवयीन युवकांमध्ये भाईगिरीची क्रेज वाढत चाललेली होती. अनेक मुलांनी शरीरावर ग्रुपची नावे गोंदल्याचे तसेच शाळेमध्ये ग्रुपच्या नावाने संगठन केल्याचे समोर आले होते. तर नुकतेच विद्यालयात अल्पवयीन युवकाने एका युवकाच्या अंगावर ब्लेडने दुखापत केल्याची देखील घटना घडली होती.
दरम्यान शाळा, पोलीस प्रशासनाने ग्रामस्थ व पालकांची बैठक घेतली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस नाईक रवीकिरण जाधव, सरपंच संगीता हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, माजी उपसरपंच विजयराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे, प्राचार्य बाबाजी गोरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बाळासाहेब दरेकर, दगडू दरेकर, रामदास दरेकर, राजेश भुजबळ, अमोल दरेकर, बाळासाहेब मोरे उपस्थित होते. यावेळी पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तर शाळेमध्ये केस वाढवून येणाऱ्या मुलांचे शाळेतच केशकर्तन करण्यात आले आहे.
“सणसवाडी येथील विद्यालयात पोलिसांनी मुलांचे समुपदेशन केले आहे, दरम्यान सरपंच यांनी मुले वारंवार सांगून ऐकत नसल्याने त्यांची शाळेतच कटिंग करू असे सांगितले. काही मुलांची शाळेतच कटिंग केली, तर शरीरावर असलेले गोंदन काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
– बाबाजी गोरे, प्राचार्य