पुणे जिल्हा: शिक्रापुरात नऊ महिन्यांनी वाजणार शाळेची घंटा

शिक्रापूर (वार्ताहर) – करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच सरकारकडून शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या, त्यांनतर सरकारने 23 नोव्हेंबर रोजी नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिक्रापूर परिसरातील विद्याधाम प्रशाला पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती प्राचार्य रामदास चव्हाण यांनी दिली.

यावेळी प्राचार्य रामदास चव्हाण, शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाश बोरा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मांढरे, उपाध्यक्ष अर्चना नरवडे, सदस्य शेरखान शेख, केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे, ग्रामपंचायत सदस्या मीना सोंडे, उपप्राचार्य बाळासाहेब दहीफळे, पर्यवेक्षक सुभाष पाचकर, दिगंबर नाईक, कल्पना तोडकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे आदी उपस्थित होते.

सरकारने 23 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यावेळी नियमावली आखून सर्व शिक्षकांची करोना तपासणी करण्यास आली आहे, तर नुकत्याच झालेल्या बैठकीत नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक वर्गात पंचवीस विद्यार्थी बसविले जाणार असून, पहिल्या सत्रात नववी व दहावी आणि दुसऱ्या सत्रात अकरावी-बारावीचे वर्ग भरविले जाणार आहेत. यापूर्वी शाळेतील 500 पालकांनी शाळा सुरू करण्याबाबतचे संमतीपत्र लिहून दिले असून, त्यापैकी 475 पालकांनी होकार दर्शविला आहे, तर उर्वरित पालकांचे संमतीपत्र देखील घेण्यात येणार आहे. पर्यवेक्षक सुभाष पाचकर यांनी प्रास्ताविक केले, तर दिगंबर नाईक यांनी आभार मानले.

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला शाळेसमोर दररोज भाजी बाजार भरत आहे. हा भाजी बाजार हटविण्याची वारंवार मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या शाळा सुरू होणार असल्याने येथील बाजार हटविणे गरजेचे आहे. शाळा सुरू होणार आहे, त्यामुळे उद्यापासून तेथील भाजी बाजार हटवण्यात येणार आहे.
– बापूसाहेब गोरे, ग्रामविकास अधिकारी शिक्रापूर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.