ओझर :- जुन्नर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी विधानसभा निवडणुकीत मनापासून काम केलेले आहे, मतदारांचा कौल मान्य आहे, तो स्वीकारला आहे, नियोजनामध्ये आपलीच काहीतरी गडबड झाली, आम्हीच कमी पडलो आहोत हे मान्य करतो आणि आघाडीतील सर्व घटक पक्षातील सहका-यांना पुढे घेऊन जात असताना बांधलेली व्रजमुठ कायम ठेवून होणार्या सर्व निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सज्ज झाला आहोत. या पुढील काळात आपल्या सर्वासाठी 24 तास कार्यरत राहणार आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते सत्यशिल शेरकर यांनी केले.
महाविकास आघाडीच्या वतीने नारायणगाव येथील जयहिंद पॅलेस येथे आयोजित कार्यकर्ता आभार मेळाव्यात सत्यशील शेरकर हे बोलत होते. यावेळी शरद लेंडे, दिलीप कोल्हे, तुळशीराम भोईर, अनंतराव चौगुले, माऊली खंडागळे, अशोक घोलप, अनिल तांबे, अंकुश आमले, मोहित ढमाले, धोंडीभाऊ पानसरे, योगेश पाटे, तुषार थोरात, गुलाब पारखे, वल्लभ शेळके, बाबा परदेशी, सैद पटेल, शरद चौधरी, मंगेश काकडे, संभाजी तांबे, बाजीराव ढोले, सुनिल मेहेर, काळू गागरे, जयवंत घोडके, अशोक घोडके, दिलीप डुंबरे, श्याम माळी, प्रकाश जाधव, गेनभाऊ तट्टू, कुंडलीक गायकवाड, रंगनाथ घोलप, मोहन बांगर, समीर भगत, शांता कुटे, सुरेखा वेठेकर, सुरेखा मुंढे, अर्चना भुजबळ, धनंजय डुंबरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्यशील शेरकर म्हणाले, निवडणुकीबाबत आपल्याला चर्चा करायची नाही, सर्वांनी मनापासून काम केलं आहे. आपण सहकारातील निवडणूक आजपर्यंत लढवली आहे, राजकीय निवडणुकीचा अनुभव नव्हता, तो आता चांगला आला आहे. आता कुठल्या निवडणुकांना कमी पडणार नाही. पुढील सर्व निवडणुकीसाठी आपण सज्ज आहोत. कमी वेळेत आपल्या सर्वांच्या सहकार्याने मोठे मतदान घेता आले आहे, याबाबत समाधान असून सर्व घटक पक्षांनी चांगले काम केले याचा निश्चित आनंद आहे. मतदारांचा कौल मान्य आहे तो स्वीकारला आहे. मतदारसंघात फिरण्यासाठी प्रचारासाठी केवळ 17-18 दिवसच मिळाले. तरीही सर्वांना बरोबर घेऊन निवडणुकीत उतरलो व प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, ठीकठिकाणी मतदारांनी स्वागत केले याचा आनंद आहे. मतमोजणीनंतर दुसर्या दिवसापासून आपण लोकांच्या सुखदुःखात जाण्यास सुरुवात केली आहे. आता सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचे आहे, निवडणुकीत बांधलेली व्रजमूठ महाविकास आघाडीला सोबत घेऊन पुढे निवडणूक लढवायची आहे.
ईव्हीएमबद्दल बोलणार नाही
ईव्हीएम मशीन बद्दल राज्यात वेगवेगळी चर्चा आहे; मात्र आपण त्याबद्दल काही बोलणार नाही, निवडणुकीत जनतेचा जो कौल आहे तो एक दिलाने, मनापासून स्वीकारत आहोत, आपण कोणते चूक किंवा चांगले वाईट असे बोलणार नाही. नवीन लोकप्रतिनिधींना आपण शुभेच्छा देत आहोत. येणार्या निवडणुकीला आपल्या सर्वांच्या साथीने सामोरे जायचे आहे, यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शेरकर यांनी केले.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत मतदारांनी जो विश्वास टाकला, या पुढील काळातही तो विश्वास टिकवण्याची जबाबदारी सर्वांची आहे जनतेने दिलेला निर्णय स्वीकारावा लागतो, कोणाला दोषी धरण्यात अर्थ नाही. आपल्याला सर्वांना एकत्र पुढे जायचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाऊया.
-शरद लेंडे, माजी गटनेते जिल्हा परिषद
Pune District | ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर, बैलगाडी रिफ्लेक्टर बसवावेत
यशाचे सर्व धनी असतात; परंतु अपयशाचे धनी कोणी नसतं. अपयश पचवायची ताकद सर्वांमध्ये असावी लागते, ती सत्यशील शेरकर यांच्यामध्ये आहे. आपण अल्पमताने पराभूत झालो आहोत, जुन्नर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व एक जुन्नर शहर यापैकी चार जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीला आघाडी आहे, तर जुन्नर शहर व तीन गटांमध्ये थोड्या प्रमाणात कमी मतदान महाविकास आघाडीला झाले आहे. तथापि पोस्टल मतदानात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. सत्ता आल्याने सत्ताधारी मंडळी म्हणतील तिकडे काय आहे, इकडे या; परंतु आपण एकनिष्ठ शिवसैनिक आहोत, या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. पुढील काळात महाविकास आघाडी येणार.
-माऊली खंडागळे, जुन्नर तालुका प्रमुख शिवसेना
उपसरपंच योगेश पाटे म्हणाले, 67 हजार लोकांचे प्रतिनिधित्व त्यांना करायचे आहे. त्यामुळे पुढील काळात एकजुटीने, एक दिलाने सर्वांनी काम करायचे आहे. यावेळी मंगेश काकडे, मोहन बांगर, सुरेखा वेठेकर आदींनी आपले विचार व्यक्त केले.