लोणंद (प्रतिनिधी) – लोणंद येथील श्री कालभैरवनाथ वार्षिक यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत सार्थक सूर्यकांत गायकवाड यांच्या गाड्याने प्रथम क्रमांक पटकात ढाल आणि रोख 71 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले .
करोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर होत असलेल्या लोणंद येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत सातारा तसेच पुणे, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ऐंशीपेक्षा अधिक बैलगाडा चालकांनी हिरीरीने भाग घेतला. शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी लोणंद- निंबोडी रस्त्याला हजारो शौकिनांनी भर ऊन्हात हजेरी लावली.
भिर्रऽऽऽऽऽऽ करत भरऊन्हात धुरळा उडवत अत्यंत चुरशीने चाललेल्या या शर्यती संध्याकाळी ऊशीरापर्यंत सुरू होत्या. या शर्यतीत सार्थक सूर्यकांत गायकवाड यांच्या गाड्याने प्रथम क्रमांक मिळवत 71 हजाराचे पहिले बक्षीस पटकावले तर द्वितीय क्रमांक साहेबराव शेळके यांना 51 हजाराचे दुसरे बक्षीस मिळाले.
तृतीय क्रमांकांचे 31 हजाराचे बक्षीस संतोष शिवतारे यांना मिळाले तर चौथ्या क्रमांकाचे 21 हजारांचे बक्षीस सुजित शेळके यांना मिळाले तर पाचव्या क्रमांकाचे 11 हजाराचे बक्षीस रामभाऊ केसकर आणि निखील ठोंबरे यांच्यात विभागून देण्यात आले.
या स्पर्धेचे समालोचन माजी सैनिक म्हस्कू आण्णा शेळके- पाटील आणि सचिन शेळके- पाटील यांनी केले तर स्पर्धेदरम्यान पंच म्हणून यात्रा कमिटीने काम पाहिले.