कचरा प्रश्नावरून वादाची ठिणगी : पोलिसांच्या हस्तक्षेपाने वादावर पडदा
शिक्रापूर – येथील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे दोन गट पडले आहेत. अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे दोन्ही गटांत मतभेद होत आहेत. येथील कचरा प्रश्नाबाबत दोन्ही गट रविवारी (दि. 17) सायंकाळी एकमेकांना भिडले. याप्रसंगी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने या वादावर अखेर पडदा पडला आणि कचऱ्याचा प्रश्न थेट ग्रामसभेत गेला.
शिक्रापूर येथे गावातील मुख्य समस्या कचरा असून सध्या कचरा वेळनदीच्या कडेला आणून टाकला जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी गावामध्ये संकलित झालेला सर्व कचरा पुणे येथील कचरा प्रकल्पाला देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे सर्व कचरा पुण्याला तर ग्रामपंचायतीया माध्यमातून तात्पुरता कचरा प्रकल्प शेड उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. परंतु उपसरपंच रमेश थोरात व त्यांच्या गटाने हे काम बंद पाडले, मात्र कचरा टाकल्या जाणाऱ्या जागेवर कचऱ्याचे मोठे ढीग साचले गेले, तर सध्या पुणे येथे जाणारा कचरा सरपंच रमेश गडदे यांनी खर्च जास्त होत असल्याचे कारण पुढे करत बंद केला. त्यामुळे येथे टाकला जाणारा सर्व कचरा बाजार मैदानात पोहोचला असल्याने बाजार मैदानाला कचरा कुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
यावेळी मात्र उपसरपंच रमेश थोरात व त्यांच्या गटाने पुढाकार घेत पुणे येथून कचरा घेऊन जाणारी गाडी बोलावून कचरा गाडीमध्ये भरून दिला. यावेळी सरपंच रमेश गडदे यांनी त्याठिकाणी येत गाडीमध्ये कचरा न नेण्याचा पवित्रा घेतला. यावेळी दोन्ही गट एकमेकांना भिडले. याप्रसंगी शिक्रापूरचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांसह आदींनी त्याठिकाणी धाव घेत हस्तक्षेप करुन कचरा प्रश्नाबाबतचा वाद मिटविला. त्यानंतर सध्या कचऱ्याचा प्रश्न ग्रामसभेतून निकाली काढण्याचे अखेर ठरविण्यात आले.
शिक्रापूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कचरा विषयावरून किरकोळ वाद झाला होता. आम्ही तो मिटवला असून ग्रामसभेमध्ये विषय घेऊन अथवा दोन्ही गटांनी पोलीस स्टेशन येथे येऊन आपले म्हणणे मांडावे. तसेच वाद मिटवावा असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
– विक्रम साळुंके, सहायक पोलीस निरीक्षक
शिक्रापूरच्या कचरा समस्याबाबत दोन्ही गटांत मतभेद आहेत. आता कचऱ्याचा निर्णय ग्रामसभेतून घेण्याचे ठरले आहे. दोन दिवसांत ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कचरा समस्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
– बापूसाहेब गोरे, ग्रामविकास अधिकारी