केंदूर-माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत कोविड सर्वेक्षण सुरू आहे. सारडवाडी (ता. शिरूर) येथील शिक्षक भरत सरोदे यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे सरोदे यांचे दुर्दैवाने निधन झाले. त्यामुळे भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी शिक्षकांना सर्वेक्षणातून मुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाचे तहसीलदार निवास ढाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने 50 वर्षे वयाची अट घालून दिली आहे. तरीदेखील 51 वर्षाच्या शिक्षक भरत सरोदे यांना या सर्वेक्षणाच्या कामात समाविष्ट करण्यात आले. सरोदे यांना हृद्यविकाराचा त्रास असतानाही कोविड सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली.
त्यामुळे शिक्षक सरोदे यांचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे कोविड सर्वेक्षणात जे शासकीय कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी यांना या कार्यातून मुक्त करावे, अशी मागणीही जयेश यांनी केली आहे.
पन्नास वर्षावरील आणि आजारी शिक्षकांना या सर्वेक्षणात समाविष्ट केले आहे. त्यामुळे आमच्या सहकाऱ्याचा नाहक बळी गेला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी व सरोदे कुटुंबीयांना न्याय मिळावा. यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत.
– बबनराव उकिर्डे, अध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी