सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एमएसपीचा प्रश्न, साखर निर्यातीची मागणी, नदीच्या पाण्याचे कारखान्यांमुळे होणारे प्रचंड प्रदूषण, यावर सर्व कारखान्यांनी एकत्रित होऊन मार्ग काढवा तसेच तसेच यावर्षीच्या पहिल्या उचलीबाबत सभासदांमध्ये असलेल्या नाराजीचे वातावरण, अशी विविध प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (दि.११) सोमेश्वर कारखान्यास भेट दिली. मात्र, यावेळी चेअरमन, संचालक मंडळ उपस्थित नव्हते. त्यामुळे सभासदांच्या प्रश्नाबाबत पुन्हा सोमेश्वरच्या चेअरमन व संचालक मंडळाला पत्र देऊन लवकरच चर्चा करणार असल्याचे खासदार सुळे यांनी पत्रकारांना सांगितले.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उसाची पहिली उचल २८०० रुपये दिली आहे. सभासदांच्या आग्रहास्तव बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय राजकारणातून उडी घेत बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या साखर कारखानदारीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सोमेश्वर कारखान्यावर शनिवारी (दि.११) दाखल झाल्या.
सोमेश्वर कारखान्याची गेल्यावर्षीची पहिली उचल आणि आत्ताची उचल यामध्ये बरीच तफावत असल्याने सोमेश्वरमधील सभासद देखील नाराज असल्याची चर्चा कारखाना कार्यस्थळावर होती. काही सभासदांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सभासदांच्या आग्रहाखातर सुळे यांनी कारखाना प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी व कारखान्याला एमएसपी, साखर निर्यात तसेच कारखान्यांचे नद्यांत होणारे प्रदूषण याची माहिती जाणून घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळाला भेट दिली.
यावेळी युगेंद्र पवार, राजेंद्र जगताप, प्रदीप शेंडकर, प्रदीप कणसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व सोमेश्वर कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातील काही सभासदांनी खा.सुळेंना विनंती केली की कारखान्याचे एमडी यांच्याशी चर्चा करण्याबरोबरच कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्याशी देखील चर्चा करण्यात यावी. कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन कारखाना प्रशासनास त्यांच्या वतीने तसे पत्र दिले.
पहिल्या उचलीवर प्रशासनाशी चर्चा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे खासदार सुळे यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले होते. कारखाना प्रशासनाने पहिली उचल २८०० रुपये दिली. त्याबाबत पहिली उचल वाढवून देता येते का, याबाबत निवडक सभासदांना घेऊन खासदार सुळे यांनी कारखान्याचे एम. डी. राजेंद्र यादव यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी युगेंद्र पवार, राजेंद्र जगताप यांच्यासह सोमेश्वरचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.