पुणे जिल्हा: द्राक्ष उत्पादकांना पावसाचा झटका

जुन्नर तालुक्‍यातील शेतकरी चिंतेत : सलग दुसऱ्या वर्षी उत्पादनात घट होण्याची भीती

Madhuvan

पुणे  -मुसळधार पावसाने बुधवारी (दि. 14) रात्री जुन्नर तालुक्‍याला झोडपून काढले, त्यामुळे शेतीसह सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही द्राक्ष उत्पदकांना पावसाने झटका दिला आहे. फुलोरा व पेंगा अवस्थेतील द्राक्ष बागांना बसला आहे.

गेल्यावर्षीही ऑक्‍टोबरच्या शेवटच्या व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्षपीक हातचे गेले होते. तर यंदाही तिच परिस्थी ओढवली असल्याने द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक कंबरडे मोडला आहे. तर येडगाव, वडज, गुंजाळवाडी, नारायणगाव या बागायती पट्ट्यात तब्बल 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जुन्नर तालुक्‍यात साधरणत पाच ते सव्वापाच हजार एकर क्षेत्रात द्राक्षबागा घेतल्या जातात. दरवर्षी अर्ध्यापेक्षा अधिक बागांची छाटणी ऑक्‍टोबर महिन्यात होते. मात्र, यंदा पाऊस बरसतच असल्याने छाटणी पुढे ढकली गेली आहे. सप्टेंबर महिन्यात अंत्यत मोजकी तोडणी करण्यात आली आहे. मात्र, ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला पावासाने विश्रांती घेतल्याने काही शेतकऱ्यांनी तोडणीला सुरुवात केली होती. त्यातच सप्टेंबर महिन्यात छाटणी केलेल्या बागा फुलोऱ्यात अवस्थेत आहेत.

तर ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला छाटणी केलेल्या झालेल्या बहुतेक बागा पोंगा अवस्थेत असून बुधवारी झालेल्या या मुसळधार पावसाने या बागांना फटका बसणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या पावसामुळे घड जिरण्याचे प्रमाण वाढणार असून डावणीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली आहे.

गेल्या वर्षी 27 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अतिपावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनात 35 ते 40 टक्‍क्‍यांनी घट झाली होती. तर मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्याने निर्यातक्षम द्राक्षांची अवघ्या 15 ते 20 रुपये किलोने विक्री करावी लागली होती. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून जीवाप्रमाणे जगवलेल्या बागांतून उत्पादन खर्चही निघाला नव्हता.

तरी न खचता तो उभा राहिला व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला होता. यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने दमदार उत्पादन हाथी येण्याची उत्पादकांना आशा होती. मात्र, बुधवारी झालेल्या पावसाने पुन्हा गेल्या वर्षीसारखी स्थिती निर्माण केल्याने आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे व वर्षाचा आर्थिक गाडा कसा हाकायचा, या विंवचनेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

या पावसामुळे सर्वच द्रक्ष बागांना डावणीचा प्रादुर्भाव होण्यची भीती आहे. त्यामुळे कुज व सड अधिकप्रमाणात होणार आहे. फवारणीद्वारे बागा वाचविण्याची बळीराज कसरत करीत आहे. मात्र, वातावरणपुढे त्याचा निभाव लागत नसल्याने 30 टक्‍के खर्चात वाढ होणार असून फळांमध्ये 40 टक्‍के घट होणार आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानच अधिक होणार आहे.
– भूपाल मांडिवले, द्राक्ष बागायतदार बेल्हे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.