दिवे : सध्या रब्बी हंगाम सुरू असून रब्बी हंगामातील पिके यंदा पुरंदर तालुक्यात जोमदार आल्याचे पाहायला मिळत आहेत. रब्बीचा हंगाम आता एक ते दीड महिन्यात संपण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकरी शेतीकामात व्यस्त असून पिकांना पाणी देणे, फळफुलांची खुरपणी, तोडणी, काढणी अशी विविध कामे सुरू आहेत.
त्याचवेळी संपूर्ण पंधरवड्यात हवामान अत्यंत खराब असल्याने तसेच पहाटे धुके, दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळी कडक थंडी अशा खराब हवामानामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे त्यावर औषधांची फवारणी आणि विविध कीटक नाशकांचा खर्च करूनही रोगांचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकरी मात्र कोमात गेलाय अशीच स्थिती झाली आहे.
हंगामातील प्रमुख पिके असलेली ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, करडई ही ऐन जोमात असून त्यांना आता केवळ एक, दोन पाण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शेतकरी नियोजनात व्यस्त आहे. काही भागात पाण्याची समस्या आहे अशा भागात शेतकरी स्वतः पैसे खर्च करून पुरंदर उपसाच्या माध्यमातून पाणी आणण्यासाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारीत आहेत. तर जिथे पाणी उपलब्ध आहेत, पिके चांगली आली आहेत. अशा भागात खराब हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.
ज्वारी पिकावर खराब हवामानामुळे तांबेरा, चिकटा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तर गव्हावर तांबेरा, मावा त्याचबरोबर कांद्याला मावा मोठ्या प्रमाणात झाला असून कांद्याची पात करपली आणि पिवळी पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकर्यांना आठवड्याला विविध कीटक नाशक आणि विविध औषधांची फवारणी करावी लागत आहे. एकूणच आतापर्यंत केलेल्या खर्चाचा हिशेब केला तर मिळणार्या उत्पन्नापेक्षा आजपर्यंत झालेला खर्च जास्त असल्याने खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
विहिरीतील पाणी पातळीत मोठी घट
यंदा पुरंदर तालुक्यात बर्यापैकी पाऊस झाल्याने पश्चिम भागात आजही चांगले पाणी आहे. त्यातुलनेत पूर्व भागात कमी पाऊस झाल्याने ठराविक भाग वगळता इतर ठिकाणी बंधारे, ओढे, नाले, तलाव सर्व कोरडेच आहेत तर विहिरीतील पाणीपातळीत घट झाली आहे, अशाही स्थितीत शेतकर्यांनी जीवाचा आटापिटा करून पिके जगवली आहेत. दरम्यान, आणखी किमान एक ते दीड महिने पुरेल एवढ्या पाण्याची गरज आहे. मात्र पाणी कमी झाल्याने पिकांच्या पाण्याचा आताच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुरंदर तालुक्यात उत्तम पाऊसमान झाल्याने रब्बी हंगामात पिकांची वाढ जोमदार असून हरभरा फुलोरा अवस्थेत आहे. ज्वारी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक वाढीच्या व फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. सकाळी तापमान कमी होवून धुके पडत असल्याने पिकांवर अत्यल्प प्रमाणात तांबेरा, चिकटा यांसारखे बुरशीजन्य रोग तसेच काही प्रमाणात कीड पडल्याचे दिसून येत आहे. बुरशीचे प्रमाण अत्यल्प असल्यास मांकोझेब किंवा कार्बेन्डाझीम सारख्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
– सुरज जाधव, कृषी अधिकारी, पुरंदर तालुका
हरभरा पिकावर घाटे अळी
हरभरा पिकावर घाटे अळी आढळून आल्यास पहिली फवारणी निंबोळी अर्कची घ्यावी तसेच प्रमाण जास्त असल्यास इमामेक्टीन बेंझोएट अथवा क्लोरेंट्रिनोप्रोल ही कीटकनाशक फवारणी करावी. गहू पिकावर तांबेरा आढळून आल्यास झाईनेब किंवा प्रोपकॉनेझॉल या बुरशिनाशकची फवारणी करावी, असे आवाहन कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी केले आहे.