वाघोली : वाढती वाहतूक कोंडी आणि गंभीर अपघातांची संख्या लक्षात घेता, पुणे शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दहा किंवा त्यापेक्षा जास्त चाके असलेल्या मल्टी ॲक्सल वाहनांसह कंटेनर आणि ट्रेलर यांसारख्या अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली आहे. सहा ते दहा चाकी वाहनांना मात्र रेड झोन वगळून रात्री ११ ते पहाटे ६ या वेळेतच वाहतुकीस परवानगी असेल. रेड झोनमध्ये वाहतूक शाखेच्या पूर्व परवानगीनेच प्रवेश देण्यात येईल.
डंपर आणि मिक्सरसाठी दोन टप्प्यात बंदी :
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर धावणाऱ्या डंपरसाठी सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत बंदी असेल. तर, मिक्सर वाहनांना सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत बंदी असणार आहे. ही बंदी सोमवार ते शनिवार असेल, तर रविवारी केवळ सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत बंदी असेल.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट :
मल्टी ॲक्सल वाहनांना प्रवेशबंदी असली तरी, कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन येणाऱ्या वाहनांसह अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून सूट दिली आहे. मात्र, त्यांनाही शहरात येण्यासाठी मार्ग निश्चित केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतच जायचे असेल, तरच अशा वाहनांना प्रवेश दिला जाईल. दुसऱ्या शहरात जाऊ इच्छिणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाही पुण्यात प्रवेशबंदी केली आहे.