-वसंतराव बाणखेले आणि अॅड अमर कराळे यांची मागणी
मंचर – येत्या सप्टेंबर महिन्यात मंचर नगरपंचायतीमार्फत घेण्यात येणारी पथविक्रेता समितीची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी मंचर पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले आणि अॅड. अमर कराळे यांनी केली आहे.
याबाबत वसंतराव बाणखेले यांनी अधिकची माहिती देताना सांगितले की, मंचर नगरपंचायतची स्थापन होऊन २ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला असून आजपर्यंत सरकारने मंचर नगरपंचायतची लोकप्रतिनिधींची निवडणूक घेतलेली नाही. लोकप्रतिनिधी नसताना पथविक्रेत्यांची निवडणूक कशासाठी घेण्यात येत आहे, असा सवाल वसंतराव बाणखेले यांनी केला. पथविक्रेत्या मतदारांची यादी ही २०२२ साली अपडेट झाली आहे.
मंचरमधील पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आली असून पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करणाऱ्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली. परंतु सर्वेक्षण चालू आहे.अशा प्रकारची वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देणे बंधनकारक असताना देखील अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे मंचर गावातील बहुतांश पथविक्रेत्यांची नावे या यादीत समाविष्ट नसल्याने ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीरपणे राबवली गेलेली नाही. त्यामुळे मंचरमधील नागरिकांना काय चालले आहे. हे देखील समजले नाही.
तसेच कोणतीही निवडणूक होण्याच्या पूर्वी तीन-चार महिने अगोदर नवीन मतदार नोंदणी केली जाते. परंतु या प्रक्रियेत नव्याने एक-दीड वर्षांपूर्वी आलेल्या पथविक्रेत्यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नसून त्यांची पत्त्यासहित नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करून नव्याने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन स्थानिक पथविक्रेत्यांचा विचार करून सुधारित मतदार यादी तयार करावी. त्याचप्रमाणे परप्रांतीय पथविक्रेत्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात यावी. याबाबत कामगार आयुक्त पुणे यांनाही निवेदन पाठवले असल्याची माहिती पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले आणि अॅड. अमर कराळे यांनी सांगितले.
वसंतराव बाणखेले यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला निवेदन पाठवण्यात आले आहे. परंतु निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत सर्वांनी सहकार्य करावे.
– गोविंद जाधव, मुख्य अधिकारी, मंचर नगरपंचायत.